Pages

Saturday, September 21, 2024

हळद व अद्रक पीक व्यवस्थापनावर ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादामध्ये मार्गदर्शन

 संवादामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरावर भर द्यावा.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

हळद व अद्रक ही पिके कंदवर्गीय असल्यामुळे यामध्ये जमिनीतून उद्भवणारे किडीवर रोगांचे परिणाम होण्याची शक्यता असते. या पिकांच्या व्यवस्थापनावर योग्य मार्गदर्शन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे  होत आहे. तसेच यापिकांसाठी विद्यापीठ विकसित बायोमिक्सचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक २० सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या बाराव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यापीठामध्ये नोंद घेतली जात असून या प्रश्नांच्या आधारित संशोधनासाठी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी उपयोगिता होईल. या संशोधनाचा भविष्यात शेती विकासासाठी लाभ होईल. याकरिता कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरावर भर द्यावा असे नमूद केले.

तांत्रिक मार्गदर्शनात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगितला. उद्यान विद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे यांनी हळद व अद्रक पीक व्यवस्थापन यासाठी विकसित नवीन तंत्रज्ञान आणि वाणांची माहिती दिली. पीक रोग तज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी हळद व अद्रक पिकातील रोग आणि त्यांचे नियंत्रण याविषयी तर कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात बहुसंख्येने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हळद व अद्रक विकास सह सोयाबीन, कापूस, फळबाग याविषयी प्रश्न विचारले यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. दिगंबर पटाईत. डॉ. अनंत लाड, डॉ. गजानन गडदे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.