Pages

Wednesday, October 2, 2024

वनामकृवित स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि स्वच्छ भारत दिन साजरा

 सर्वांनी आपले मन स्वच्छ, विचार स्वच्छ आणि कार्य स्वच्छ ठेवावे.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि स्वच्छ भारत दिन” दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमाद्वारे साजरा केला. यानिमित्त विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाद्वारे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या  महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे तर विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि शेतकरी भवन येथे तसेच इतर कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, स्वच्छ परिसर, स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ समाज असावा, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आग्रही होते. यावर्षी स्वच्छता मोहीमेसाठीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” थीमनुसार मनाची स्वच्छता, विचारांची स्वच्छता आणि कार्याची स्वच्छता हे सर्वात महत्त्वाचे आहे. याचे भविष्यात नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील. गांधीजी स्वतः सर्वात घाणीच्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करत आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देत. गांधीजींच्या विचारानुसार विचार स्वच्छ असतील तर कार्य स्वच्छ होते आणि यातून समाज चांगला बनतो. म्हणून स्वच्छतेचे कार्य हे केवळ एक तास किंवा एक दिवसा पुरता न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याबरोबरच गांधीजींचा अहिंसेचा विचार देखील महत्त्वाचा आहे. आपल्या मनात हिंसा येत असेल तर आपण एकही चांगले कार्य करू शकत नाही. म्हणून विचार अहिंसायुक्त स्वच्छ ठेवावे. आपल्या अधिकारासाठी अहिंसायुक्त कार्य करावे. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण एखाद्या विरुद्ध हिंसा ने प्रतिकार करतो, यावेळी आपली ताकत अर्धी होते, परंतु अहिंसेने प्रतिकार करताना आपली दुप्पट ताकत येते. भारताद्वारे संपूर्ण जगाला अहिंसेचे पुजारी, शांतीचे दूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शांततेचा संदेश दिला जात आहे. सर्वांनी आपले मन स्वच्छ, विचार स्वच्छ आणि कार्य स्वच्छ ठेवावे. दुसऱ्याविषयी मनात कटुता ठेवू नये. हा गांधीजींचा विचार, त्यांचे मानस मुलगा आणि मुलगी बनून पुढे घेवून जावू. गांधीजींचे विचार निरंतर पुढे चालू ठेवून समाजात शांतीद्वारे एकजुटीने कार्य करून समाज कल्याण साधू असे प्रतिपादन केले.

शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी प्लास्टिक मुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या उद्भवतात. याकरिता प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावावी. आपला परिसर प्लास्टिक मुक्त ठेवावा. याबरोबरच महात्मा गांधीजी यांच्या स्वच्छतेचा आणि अहिंसेचा विचार मनात रुजवून स्वभावातच स्वच्छता ठेवावी असे नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर यांनी अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसेच पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू निर्माण होतात. याचा जीवित तसेच वनस्पतीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा. याबरोबरच गांधीजींचे स्वच्छतेचे गुण अंगी करावेत असे प्रतिपादन केले

कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर बी क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी आर झंवर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले. कार्यक्रमा दरम्यान विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, निबंध स्पर्धा, व्हिडिओ क्लिप बनवणे, निबंध, भाषण अश्या विविध स्पर्धा मध्ये सहभागी होऊन विद्यापीठ परिसरात स्वच्छतेचे संदेश देवून स्वच्छतेचे कार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय पवार, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. रवी शिंदे, डॉ. प्रवीण घाडगे,  डॉ. विद्यानंद मनवर, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. वैशाली भगत आदींच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.