Pages

Thursday, October 17, 2024

अन्नतंत्र महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयात १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि महाराष्ट्र शासनाच्या अन्न औषध प्रशासन विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त श्री. दिलीपकुमार संगत उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. पी. आर. झंवर आणि विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी कार्यक्रमाला दूरसंपर्क प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी अन्नाचा अपव्यय रोखण्यासाठी सरकारी उपक्रम आणि संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी भूकबळीच्या समस्येवरही चिंता व्यक्त केली आणि अन्नाचा हक्क सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवर भर दिला.

शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी जागतिक अन्न दिन २०२४ च्या ब्रीदवाक्याचे (उत्तम जीवन उत्तम भविष्यासाठी अन्नाचा अधिकार)अर्थविस्तार केला. त्यांनी पौष्टिक, सुरक्षित आणि शाश्वत अन्नाचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख वक्ते श्री. दिलीपकुमार संगत यांनी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एफएसएसएआयच्या नियमांविषयी माहिती दिली आणि अन्नाचा अपव्यय रोखण्यासाठी स्थापन केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि अन्नाची नासाडी अपव्यय कमी करणे हे काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी अन्नतंत्र क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्ती म्हणून अन्नाचे योग्य वापरावर भर दिला.

पदव्युत्तर विद्यार्थिनी कु. साक्षी जीवतोडे हिने तिच्या स्थापन केलेल्या बचतगट आणि एफपीओ बद्दल माहिती सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रिती ठाकुर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विविध प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.