समाजामध्ये पोषक आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात जागतिक अन्न दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत मौजे रायपूर (ता. जि. परभणी) येथील जिल्हा परिषद शाळेत स्वास्थ्यदायी जीवनासाठी अन्नाचे अधिकार याविषयी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या महाविद्यालयांतर्गत असणाऱ्या अन्न विज्ञान आणि पोषण विभागातील डॉ. अश्विनी बिडवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आहार विषयक शास्त्रोक्त बाबींचा आधार घेत दैनंदिन जीवनातील समतोल आहाराचे महत्व पटवून दिले. तदनंतर या विभागातील प्रा. मानसी बाभूळगावकर यांनी आरोग्यदायी जीवनासाठी भरड धान्याचे आणि सकाळच्या नाश्त्याचे महत्व उपस्थितांना विशद केले. आपल्या दैनंदिन आहारत भरडधान्याला अनन्य साधारण महत्त्व असून त्यामध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि आवश्यक खनिजे विपुल प्रमाणात असतात. भरडधान्यामुळे पाचन क्रिया सुधारून हृदयाचे आरोग्य ही राखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आहारात ज्वारी, बाजरी, भगर, राळे, नाचणी, सामा, कोद्रा, वराई अशा विविध भरडधन्याचा समावेश करणे अतिशय आवश्यक असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. याबरोबरच सकाळचा नाश्ता हा दिवसभराची ऊर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे शरीराचे आवश्यक पोषण होते आणि पाचन क्रिया सुधारते. याबरोबरच मेंदू सक्रिय होऊन एकाग्रतेत देखिल वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने नाश्ता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रावे अंतर्गत कार्यरत असणारे पदवीपूर्व विद्यार्थी (ग्राम दुत आणि ग्राम कन्या), प्रशालेतील शिक्षका, सौ. वर्षा गनमुखे, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी आणि गावकरी मंडळी सहभागी होते.