Pages

Wednesday, October 9, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ (KKSU), रामटेक यांच्यात सामंजस्य करार (MoU)

 संस्कृत आणि कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनाच्या आदानप्रदानासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) आणि महाराष्ट्रातील पहिल्या संस्कृत विद्यापीठ असलेल्या कवि  कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ (KKSU), रामटेक यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. हा करार संस्कृत आणि कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनाच्या आदानप्रदानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा कुलगुरू माननीय प्रा. (डॉ) इन्द्र मणि  आणि कवि  कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारा कुलगुरू माननीय प्रा. हरेराम त्रिपाठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उत्कृष्टता प्राप्त केली आहे. कृषी तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे. तर कवि  कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ हे संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अध्ययनावर विशेष भर देणारे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात पारंपारिक संस्कृतचे जतन आणि संरक्षण तर केले जातेच, पण आधुनिक दृष्टिकोनातून संस्कृतचा अभ्यासदेखील केला जातो. तसेच, हे विद्यापीठ समाजसेवा, वैयक्तिक समृद्धी, नेतृत्व आणि करिअर प्रगतीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या शैक्षणिक कार्यक्रमांवरही भर देते.

सामंजस्य कराराद्वारे दोन्ही विद्यापीठामध्ये  कृषी आणि प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीसंबंधित संशोधन माहिती, अध्यापन साहित्य, आणि इतर संसाधनांची देवाणघेवाण, कार्यशाळांच्या माध्यमातून अनुभवाधारित शिक्षण, संबंधित क्षेत्रात संयुक्त सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करून एकमेकांना निमंत्रण देणे, अध्यापन आणि संशोधनाच्या उन्नतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि माहिती, संशोधन साहित्य, प्रकाशने यांचे आदानप्रदान करण्यात येईल. याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दोन्ही विद्यापीठाद्वारे शैक्षणिक आणि संशोधनात्मक संयुक्त प्रकल्प राबविण्यात येतील. हा करार आधुनिक शिक्षण आणि प्राचीन ज्ञान यांना जोडणारा ठरेल आणि दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना नवे संधींचे दरवाजे उघडून देईल.