शेतकरी केंद्रित विस्तार कार्यास प्राधान्य...मा.प्रा.(डॉ)इन्द्र मणि
एकरी नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक...श्री विलास शिंदे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या भारतीय कृषी अभियंता संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये शेतकऱ्यांसाठी दिनांक १३ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील शेती - संधी व आव्हाने या विषयावर नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास विष्णू शिंदे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. प्रा.(डॉ) इन्द्र मणि हे होते.व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे (भाप्रसे), भारतीय कृषी अभियंता संघटनेचे अध्यक्ष डॉ.एस.एन.झा, शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके, संशोधन संचालक डॉ.खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर लि चे उपाध्यक्ष श्री कुमार बिमल, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.स्मिता सोलंकी, डॉ.कैलास डाखोरे, डॉ अनिल गोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने सन २००० ते २०२२ या कालावधी करिता विविध पुरस्कार देऊन गौरविलेल्या ७४ शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेतीतील कार्याबद्दल आणि संस्कृती बद्दल भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस परोडा यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील सर्व शास्त्रज्ञांनी कौतुक केले. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अविरत कार्यरत असून शेतकरी देवो भव या भावनेने कार्य करत आहे. शेतकरी केंद्रित विस्तार कार्यास प्राधान्य देत असून माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या कार्यक्रमासह ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमातून दुहेरी संवादवर भर देऊन शेतकऱ्यांच्या शंका समाधान केले जात आहे. असे प्रतिपादन करून त्यांनी कार्यक्रमात सहभागी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त सर्व शेतकरी आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांचे, उद्योजकांचे कार्यक्रमातील सहभागाबद्दल अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास विष्णू शिंदे म्हणाले की, शेती उद्योगामध्ये शेतीची मशागत, पेरणी, प्रक्रिया उद्योगासाठी तंत्रज्ञान आणि यंत्र निर्मिती साठी कृषी अभियांत्रिकी शाखेचे महत्वपूर्ण योगदान आहे. सध्या शेतकऱ्यांची मानसिकतेमध्ये बदल झालेला असून शेती व्यवसायामध्ये रुची दाखवत नाही, केवळ पर्याय नाही म्हणून शेती व्यवसाय करतात. शेती सोडून छोटी नोकरी किंवा लहानसा उद्योग करू इच्छितो. शेतीमध्ये मजूर कमतरता, वातावरण बदल, उत्पादन खर्चातील वाढ, उत्पादकता कमी, उत्पादनास कमी भाव, किडी रोगांचा प्रादुर्भाव, अशा विविध समस्यांमुळे शेतकरी अडचणी मध्ये येत आहे. तीन-चार एकर मधून शेतकऱ्यास लाखाच्या आतच उत्पन्न मिळते अशी स्थिती आहे. याकरिता एकरी नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता
आहे असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, उत्पादकता कमी असल्यामुळे तसेच शेतीतील यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे शेतकरी जागतिक पातळीवर पोहोचू शकत नाही. शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून एकत्रित येवून केवळ शेती विषयावर चर्चा करावी. शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती उद्योगाकडे वळावे. सह्याद्री फार्मच्या वतीने भाजीपाला, फळ पिके यामध्ये कार्य करण्यासाठी शेतकऱ्यांचा एक संघ करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कार्य केले जात आहे. शेतीमध्ये लागवड तंत्रज्ञानापासून ते प्रक्रियापर्यंत यांत्रिकीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञान तसेच विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याची आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. याचा पुरेपूर अवलंब केल्यास शेती उद्योग नक्कीच फायदा होतो. सुरुवातीस प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करावा लागतो तसाच शेती उद्योगात सुद्धा आहे परंतु कठोर मेहनत आणि सातत्य ठेवल्यास समृद्धी मिळू शकते. उपलब्ध सिंचन सुविधा नुसार पीक पद्धतीचा अवलंब देखील यासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी त्यांनी कृषी विद्यापीठातील कृषी आणि संलग्न शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी शेतकरी असल्याबाबतचा सातबारा पुरावा देऊन प्रवेश घेतात परंतु नंतर स्वतः शेती करत नाहीत. यामुळे त्यांनी कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना शेती व्यवसायात उतरून स्वतःचे व शेतकरी समुदायाचे उन्नती साधनाचे आवाहन केले.
भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा म्हणाले की, शेतीमाल उत्पादनापासून विक्रीपर्यंत विविध समस्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषि अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी कृषि अभियंत्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे. सध्या कृषी अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी आहे, या महत्वपूर्ण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळावे. ग्राम पातळीवरील महसूल विभागात कमीत कमी एक कृषि अभियंत्यांची नियुक्ती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा असे नमूद केले.
कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, अधिकारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.