Pages

Wednesday, November 6, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात तूर पिकातील रोग व्यवस्थापनावरील ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 तुरीच्या संशोधनामध्ये ड्रोनचा वापर करून विविध प्रयोग घेण्यात येतील... कुलगुरू मा.प्रा. (डॉ.)इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेच्या १७ व्या भागाचे आयोजन करण्यात आले. "तूर पिकातील रोग व्यवस्थापन" या विषयावर आधारित हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ५ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठात तूर पिकांवर केलेल्या विविध संशोधनांची माहिती दिली. त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेले तूर वाण, लागवड तंत्रज्ञान व शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेले भरीव संशोधन याबद्दल माहिती दिली. तूर पिकासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रयोग राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी रासायनिक घटकांचा संतुलित वापर करण्यासाठी मापदंड निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तूर पिकासह इतर पिकांच्या उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठात १२, १३, आणि १४ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृषी अभियंते सहभागी होणार आहेत. यामध्ये कृषी अभियांत्रिकीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून, शेतकरी बांधवांना याचा लाभ होईल. हा परिसंवाद विद्यापीठाच्या युट्यूब चॅनेल https://www.youtube.com/@VNMKV वर थेट प्रसारित होणार आहे,  याद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी तूर पिकाच्या विविध रोगांची ओळख, त्यांची कारणे आणि प्रभावी नियंत्रण उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसह नागपूर, अहिल्यानगर, येथून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांनी तूर पिकासंदर्भात विविध समस्या मांडल्या ज्यावर शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती सारिका नारळे यांनी केले.