Pages

Saturday, January 18, 2025

सद्यस्थितीतील शेतीविषयक प्रश्नावर वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन

 हवामान बदलामुळे शास्त्रज्ञांनी सजग होऊन कार्य करावे... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा एकोणतिसावा भाग कुलगुरू मा प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७ जानेवारी रोजी संपन्न झाला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडविण्यासाठी आठवड्यातून दोन ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यातून समाधानकारक उत्तरे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील दिसून येतो. या दोन्ही कार्यक्रमात आजपर्यंत आवर्जून कोणत्याही ठिकाणी असलो तरी विसरता सहभागी होतो. शेतकऱ्यांनी देखील कुठेही असले तरी या कार्यक्रमात नियमित सहभागी व्हावे. यातून शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासह स्वतःलाही मिळते असे सांगितले. या माध्यमातून कृषी-फलोद्यान आणि पशुधन यांच्या विकासासाठी कार्य केले जाते. शेतकरी हा विद्यापीठाचा परममित्र समजून शेत ,शेती व्यवसाय आणि शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते. विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालनालय एकसंघ होऊन कार्य करत असून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रे यांचे अधिकारी, कर्मचारी सेवाभावाने शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत. विद्यापीठाला शेतकऱ्यांना केवळ शिक्षितच करायचे नाही तर त्यांनी अवलंबलेले तंत्रज्ञान आणि केलेले प्रयोग कसे शास्त्रीय पद्धतीत बसतील ते दुसऱ्या शेतकऱ्यांच्या उपयोगी कसे पडतील यावरही काम करायचे आहे. हवामान बदलामुळे कीड रोगाचे प्रमाण वाढले त्यामुळे शास्त्रज्ञांनी सजग होऊन कार्य करावे, असे नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी प्रास्ताविकात वातावरण बदलामुळे पिकावर परिणाम होऊ शकतो असे नमूद करून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पिकाबद्दलच्या अडचणी शास्त्रज्ञाकडून सोडवून घ्याव्यात असे आवाहन केले.

यावेळी सद्यस्थितीतील पिके आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिलीसंवादामध्ये विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. सूर्यकांत पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. संतोष फुलारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संखेने शेतकरी सहभागी होते.