Pages

Sunday, January 26, 2025

कुलगुरू माननीय प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयात दिनांक २६ जानेवारी रोजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या या संवादात त्यांनी उद्यानविद्या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले.

कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, पृथ्वीवर जीवाचा उगम झाल्यापासून उद्यानविद्या विषय अस्तित्वात आहे. आपल्या पूर्वजांनी कंद, मूळ आणि फळांचा उपयोग करून जीवन जगले, म्हणूनच उद्यानविद्येला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याच्या हवामान बदलाच्या परिस्थितीत शेतीवर विविध प्रकारचे परिणाम होत असले तरी फळपिके टिकाव धरून राहतात. त्यामुळे कृषी, फळपिके आणि पशुपालन अशा समन्वित शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी, कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला. तसेच, आनंदी जीवन जगण्याची कला शिकावी, सतत खुश राहावे आणि आपले विचार प्रभावी पण नम्र पद्धतीने व्यक्त करण्याची कला आत्मसात करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी विश्वासार्ह मित्र बनवण्याचा सल्ला दिला आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारा हा संवाद अतिशय उत्साहवर्धक ठरला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.