Pages

Monday, January 27, 2025

वनामकृवित अनुसूचित जाती महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन

 सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी एक विशेष कार्य करावे... कुलसचिव मा. श्री संतोष वेणीकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - कृषीरत महिला अंतर्गत भारतीय कृषि अनुसंधान पुरस्कृत अनुसूचित जाती सब प्लॅन (एससी-एसपी) अतंर्गत ‘क्षमता बांधणी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे दिनांक २७  जानेवारी रोजी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि संशोधन संचालक माननीय डॉ खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले. प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव माननीय श्री संतोष वेणीकर हे होते. व्यासपीठावर सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे, दैठणाच्या सरपंच श्रीमती उज्वला कच्छवे, सेंद्रिय शेतीचे मुख्य अन्वेषक डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलसचिव माननीय श्री संतोष वेणीकर म्हणाले की, महिला या घराचा आधार असून घर चालवण्याची आणि नियोजनाची प्रमुख जबाबदारी काळानुरूप महिला वरतीच आलेली आहे. महिलांमधील नियोजनाचा हा नैसर्गिक गुण आहे. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी गांडूळ खत निर्मितीबद्दलचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. यातून महिला गांडूळ निर्मिती करतीलच, परंतु याला भव्य स्वरूप देऊन गांडूळ खताचे उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्री व्यवस्थापन करण्यासाठी योग्य अशा उपाययोजना कराव्या लागतील. यासाठी कृषी विद्यापीठ, महिला आर्थिक विकास महामंडळ, उगम संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामध्ये समन्वय ठेवून कार्य करावे. याबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी एक विशेष कार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे यांनी या प्रशिक्षणातून महिलांमध्ये उद्योजकता विकसित होईल अशी आशा व्यक्त केली.  सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले असून यामध्ये प्रामुख्याने परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण, दिवाळीचे फराळ तयार करण्याचे प्रशिक्षण याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातील तीस हजार मुलींना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याविषयी प्रशिक्षण दिले होते. याच्या उत्कृष्ट प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. परभणी जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी आणि बालकासह आजी आजोबा यांच्यासाठीही विशेष कार्याक्रम घेत असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविकात केंद्र समन्वयिका तथा प्रकल्प प्रभारी डॉ नीता गायकवाड यांनी योजनेद्वारे महिलांचे सबलीकरणासाठी अवलंबलेल्या कार्याची माहिती देवून  आजपर्यंतच्या कार्यांचा आढावा सादर केला.

कार्यक्रमात प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलांना गांडूळ खतासाठीच्या प्लास्टिकच्या बेडचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले.

दैठणा येथील प्रशिक्षणार्थी महिला शितल कच्छवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महीला हा महिलांच्या सक्षामिकरनाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.  प्रकल्पामार्फत यापूर्वीही विविध उपचारात्मक पदार्थ विकसित करण्यात येऊन त्याचे प्रात्यक्षिक मिळाले. शेतकरी महिला यांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी विकसित हात मोजे, कापूस वेचणी कोट तयार करणे याबाबतचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले आहे. यातून अर्थार्जन होत आहे, म्हणून त्यांनी उपस्थित महिलांना योजनेतील प्रशिक्षणासाठी वेळ द्यावा, म्हणजे यातून आपलेही सक्षमीकरण होऊ शकते असे सांगितले व आजतागायत केलेल्या कार्याबद्दल डॉ. नीता गायकवाड यांचे आभार मानले.

तदनंतर दुपारच्या सत्रात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.पापिता गौडखेडे, व डॉ.आनंद गोरे यांनी गांडूळखत निर्मिती व उद्योग या विषयी मार्गदर्शन केले आणि कोरडवाहू प्रकल्पा अंतर्गत निर्मिती करत असलेले गांडूळखत याचे प्रात्यक्षिक दाखविले. याबरोबरच एकात्मिक शेती प्रकल्पास भेट देवून विविध एकात्मिक  शेती पद्धती दाखविल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग प्रोफेशनल नवाल चाऊस यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यंग प्रोफेशनल प्रसाद देशमुख आणि संध्या शिंदे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणासाठी दैठणा आणि सनपुरी येथील ६४ महिलांनी सहभाग नोंदविला.