Pages

Friday, January 31, 2025

यांत्रिकीकरणमुळे करडई उत्पादन झाले सोपे !... कुलगुरु मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे ऑनलाईन कृषी संवादात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा एकतिसावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१ जमेवारी रोजी संपन्न झाला. 
कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव लाड यांच्या शेतीमध्ये ४० एकर वर पेरण्यात आलेल्या विद्यापीठाचे करडई  वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाचा पाहणी केल्याचे नमूद करून या वाणाद्वारे शास्वत उत्पादन मिळते असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साह्याने होत असल्याने काढणी कारणे अवघड असल्याची या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. सध्या यांत्रिकीकरणमुळे करडई उत्पादन झाले सोपे झालेले आहे. याबरोबरच मानवी आहारात करडई तेल महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या वाणांमध्ये तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायती मध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहू  मध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते. यामुळे करडई सारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे प्रतिपादन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ गिरधारी वाघमारे यांनी प्रास्ताविक करून फळ पिकांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण  गुट्टे यांनी पिकामध्ये अनावश्यक तणनाशकाचा वापर टाळावा असे नमूद करून तणनाशकाच्या लेबलक्लेम विषयी माहिती दिली. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आठवड्यातील हवामानाचा अंदाज सांगून पिके आणि पशुधनाची घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली.

कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ. विश्वनाथ खंदारे, प्रा. अरुण  गुट्टे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. झगडे, डॉ. भवर यांच्यासह आंबेजोगाई येथील कृषी विभागाचे श्री पंडित काकडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन विभाग प्रमुख प्रा अरुण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.