Pages

Saturday, March 29, 2025

उत्तर प्रदेश कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यंत्रिकीकरण योजना) योजनेस माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाचे निवृत्त सह संचालक (कृषि अभियांत्रिकी) व समन्वयक अधिकारी (पीक अवशेष व्यवस्थापन) डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव यांनी दिनांक २९ मार्च रोजी भेट दिली. या भेटीत उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर आणि प्राध्यापक हेमंत देशपांडे यांची उपस्थिती होती.

भेटीदरम्यान डॉ. श्रीवास्तव यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेली विविध बैलचलित अवजारे प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी या अवजारांची उपयुक्तता लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी करार करून ही अवजारे उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाच्या सहकार्याने ही अवजारे लवकरच तेथील शेतकऱ्यांच्या सेवेत आणली जाणार आहेत.

यामध्ये दोन बैलचालित क्रीडा टोकन यंत्र, तीन पासे खत कोळपे, धसकटे गोळा करण्याचे अवजार, सौर ऊर्जाचलित फवारणी यंत्र, कापूस खत व बी टोकन यंत्र, आजारी पशु उचलणे यंत्र, जनावरांसाठी ब्रूमिंग व वॉशिंग युनिट, बैलचलित कृषि प्रक्रिया उद्योग, हळद व आले काढणी अवजार यांचा समावेश आहे. डॉ. श्रीवास्तव यांनी या सर्व अवजारांची बारकाईने पाहणी केली आणि समाधान व्यक्त करत योजनेच्या कार्याची प्रशंसा केली.

या भेटीदरम्यान संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, अभियंता अजय वाघमारे व दीपक यंदे यांनी विविध अवजारांची सविस्तर माहिती दिली तसेच प्रात्यक्षिके सादर केली. तसेच योजनेतील रुपेश काकडे, मंगेश खाडे, श्रीमती पवार आणि स्वप्निल खराटे यांनी या कार्यात सहकार्य केले.

या महत्त्वपूर्ण भेटीमुळे मराठवाड्यातील कृषि संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसाराला नवी दिशा मिळेल तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा लाभ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.