Pages

Wednesday, May 14, 2025

वनामकृविच्या मानवत येथील ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन संस्था जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत मानवतजवळील ॲग्री-फोटोव्होल्टेईक (Agri-Photovoltaic) संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पास दिनांक १३ मे रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या संशोधन प्रयोगांची पाहणी केली व मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, संशोधन हे शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्रस्थानी ठेवून व्हावे. नवतंत्रज्ञान विकसित करताना त्याचा प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांना होईल, याची खात्री असली पाहिजे. विद्यार्थी संशोधनामध्ये सातत्य ठेवून नव्या दिशा शोधत राहाव्यात.

सद्यस्थितीत उन्हाळी मूग व टोमॅटो या पिकांवर ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी या प्रयोगांचे निष्कर्ष सादर करताना सौरऊर्जेचा शेतीशी योग्य समन्वय साधून पिकांच्या उत्पादनात वाढ, पाणी बचत आणि शाश्वत शेतीस मदत होईल, असे दाखवून दिले.

या भेटीदरम्यान प्रकल्प प्रमुख डॉ. गोदावरी पवार, डॉ. राहुल रामटेके, डॉ. बी. एम. कलालबंडी यांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा भजनावळे, कु. शुभांगी बोरकर व कु. भक्ती पुणे यांनी आपले प्रयोग सादर केले.

सदर प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्यास नवी दिशा मिळत असून, सौरऊर्जेचा शाश्वत शेतीत प्रभावी वापर यासाठी ॲग्री-फोटोव्होल्टेईक हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान ठरणार आहे.