Pages

Thursday, June 26, 2025

राष्ट्रीय सोयाबीन हितधारक कार्यशाळेत परभणी विद्यापीठाचा सहभाग

 केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले उल्लेखनीय सादरीकरण

इंदोर (मध्यप्रदेश) येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान संस्था येथे दिनांक २६ जून २०२५ रोजी सोयाबीन हितधारक कार्यशाळेचे (Soybean Stakeholders’ Workshop) आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान हे होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. एम एल जाट, पीक विज्ञानचे सहसंचालक डॉ. डी. के. यादव,  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेमध्ये माननीय केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या योगदानाचे सादरीकरण करताना म्हणाले की, परभणी विद्यापीठ हे १९७५ पासून सोयाबीन संशोधनामध्ये सक्रिय असून आजपर्यंत विद्यापीठाने एकूण १४ वाण विकसित केले आहेत. यामध्ये एमएयुएस ६१२, एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ हे अलीकडेच विकसित केलेले रोगप्रतिरोधक व ताणसहनशील वाण शेतकऱ्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरले आहेत. मराठवाड्यातील अनेक शेतकरी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर १० ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन यशस्वीरित्या घेत आहेत. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:या भावनेतून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या दृष्टीने, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा विशेष उपक्रम राबविला जातो. तसेच आठवड्यातून दोन दिवस ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद” घेण्यात येतो. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांनुसार मार्गदर्शन व तांत्रिक उपाय दिले जातात. विद्यापीठ सध्या बीज उत्पादनातही भरघोस यश मिळवत असून काढणी तंत्रज्ञानामध्ये लघु ट्रॅक्टर, रिपर यंत्र आदी उपकरणांचा वापर करून नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याशिवाय विद्यापीठाने शिफारस केलेली रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कार्यक्रमादरम्यान माननीय केंद्रीय कृषीमंत्री महोदयांनी असे नमूद केले की, अधिक पाणी किंवा ताण सहन न करणारा सोयाबीन हे उत्पादनातील एक मोठे आव्हान आहे. यावर उपाय विचारल्यावर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ वाणांचा वापर व विद्यापीठाने शिफारस केलेल्या लागवड पद्धतींचे अवलंबन केल्यास हे आव्हान कमी करता येते, असे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माननीय केंद्रीय कृषीमंत्री महोदयांनी या वेळी मध्यप्रदेशचे माननीय कृषिमंत्री यांच्यासह विद्यापीठाला आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर माननीय कुलगुरूंनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करत त्यांना भेटीचे आमंत्रण दिले.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातून विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ सुनील उमाटे, परभणी येथील प्रगतिशील श्री. मंगेश देशमुख, श्री. गजानन कदम आणि श्री. संदीप खटिंग हे सहभागी झाले होते. कार्यक्रमात श्री. मंगेश देशमुख यांनीही त्यांची सोयाबीन उत्पादनातील यशोगाथा मांडली. तसेच ते म्हणाले की, विद्यापीठाने सोयाबीन शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बियाणे तसेच उत्पादन व संरक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता करून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, विद्यापीठाचे योगदान देशपातळीवरही उल्लेखनीय ठरत आहे.

या कार्यशाळेत देशातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक, बियाणे संचालक, केंद्र व राज्य कृषी विभागांचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे, तसेच भारतातील सोयाबीन प्रक्रिया उद्योग संघटनाचे प्रतिनिधीखाद्यप्रक्रिया उद्योग, तेल उद्योग, बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसेवी संस्था व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.