हुमणी व पैसा (मिलीपीड) किडीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांनी सुचविले उपाय
खरीप हंगामाची सुरुवात झालेली असतानाच हवामानातील अनिश्चिततेमुळे पिकांवर
किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पिकांचे संरक्षण करणे
अत्यंत आवश्यक बनते. यासाठी वेळेवर व योग्य तंत्रज्ञान उपलब्ध होणे महत्त्वाचे
आहे. हे लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मागील वर्षी सुरू
केलेल्या ‘ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या उपक्रमाचा ५२वा भाग दिनांक २७
जून २०२५ रोजी संपन्न झाला.
हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली
आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
करण्यात आला होता.
या वेळी खरीप हंगामात पिकांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या हुमणी व पैसा (मिलीपीड) किडीमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. यासंदर्भात कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी या किडींच्या जीवनचक्राचे विश्लेषण व नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी भुंगेरे या किडीचे जीवनचक्र चार अवस्थांमध्ये पूर्ण होते – अंडी (८-१० दिवस), अळी (६-८ महिने), कोष (२-३ आठवडे) व प्रौढ अवस्था (१-३ महिने). एक मादी सुमारे २०–२५ अंडी घालते. अळी अवस्था सर्वात हानीकारक असून मुळे कुरतडून पीक नष्ट करते. तसेच पैसा (मिलीपीड) किडीचे जीवनचक्र सांगताने म्हणाले की, मादी १०० ते ३०० अंडी घालते. अंडी फुटून बाहेर पडणारी अळी साधारणतः १० अवस्थांमधून जाते. प्रत्येक अवस्थेनुसार अंग व पायांची संख्या वाढते. शेवटी प्रौढ कीड तयार होते. एक प्रौढ कीड ३६ ते ४०० पाय असू शकतात.
या किडींच्या नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांचा वापर शिफारशीत प्रमाणात
करावा, यामध्ये फिप्रोनिल, थायमेथॉक्साम, क्लोथियानिडीन, इमिडाक्लोप्रिड, बायफेंथ्रिन इत्यादींचा समावेश आहे. पीकनिहाय शिफारशींचा वापर करून योग्य
प्रमाणात फवारणी/बियाणे प्रक्रिया करावी.
यासाठी त्यांनी एकात्मिक व्यवस्थापन उपायामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक
नियंत्रणासोबतच स्वच्छ शेती पद्धती, सेंद्रिय खतांचा समतोल वापर, अळी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी योग्य वेळी कार्यवाही आणि पिकांची फेरपालट
यांसारखे उपाय अंमलात आणावेत, या किडींचे जीवनचक्र एक वर्षापर्यंत असते व त्यामुळे
एकच पिढी पिकांवर प्रभाव टाकू शकते. पैसा किडीचे जीवनचक्र २-३ वर्षांचे असल्यामुळे
तिचे नियंत्रण एकत्रित व दीर्घकालीन उपायांनीच शक्य आहे, असे नमूद केले.
या कार्यक्रमात हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील
पावसाचा अंदाज दिला आणि पिकांची काळजी घेण्यासाठी शिफारशी केल्या.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला. त्यांनी विविध शंकांची विचारणा केली, त्याचे समाधानकारक निरसन
शास्त्रज्ञांनी केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिके, फळपिके
आणि पशुधन व्यवस्थापनाविषयीही संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.
दिगंबर पटाईत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले.