Pages

Thursday, June 5, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

 प्लास्टिक प्रदूषण रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी!… डॉ जया बंगाळे


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिनांक ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या "प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करा " (बीट प्लास्टिक पोल्यूशन ) या जागतिक घोषवाक्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे यांचे यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित जागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मार्गदर्शनात त्यांनी प्लास्टिकचा अतिरेक आणि त्याचे जलचर, प्राणी,वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम गंभीर पातळीवर पोहोचल्याची उपस्थितांना जाणीव करून दिली .दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिक समुद्रात आणि जमिनीवर टाकले जात असल्याने नैसर्गिक परिसंस्थांवर मोठे संकट निर्माण करत असल्याचे विशद केले. त्यांनी स्लाईड शो द्वारे पर्यावरणाच्या सद्यस्थितीचे चिंताजनक वास्तव मांडत, पृथ्वीवरील पर्यावरणावर होत असलेल्या ऱ्हासाचे भीषण परिणाम, वाढती नैसर्गिक आपत्ती, हवामानातील असंतुलन आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले संकटे यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाष्य केले. त्यांनी एकल वापर (सिंगल यूज )लास्टिकच्या विविध वस्तू  वापरण्यास नाही असे ठामपणे म्हणायला शिका असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तीपत्रकांमधून पर्यावरण रक्षणाचे जाणीवपूर्वक संदेश दिले. 'प्लास्टिक मुक्त परिसर' ही शपथ घेतली गेली, तसेच परिसरात वृक्षारोपण करून प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

याप्रसंगी डॉ. वीणा भालेराव  यांच्या समवेत महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट विषयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून प्रा. ज्योती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण दिन फक्त एक दिवसापुरता न ठेवता, पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याचा संकल्प करण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.