शेतकऱ्यांना शाश्वत शेती उत्पादन घेवून अधिक उत्पन्न मिळविता येईल.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV) आणि
आयएमसी (IMC) चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मुंबई यांच्यात मराठवाडा विभागातील कृषि, व्यापार व
गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार दिनांक ९ जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या IMC
वाणिज्य व उद्योग मंडळाच्या ११७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात
आला. ही सभा IMC भवनातील वालचंद हीराचंद सभागृहात पार पडली.
या सभेला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि आणि माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व ‘महाराष्ट्र
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)’चे मुख्य
कार्यकारी अधिकारी माननीय श्री. प्रवीण परदेशी हे सन्माननीय अतिथी म्हणून होते.
हा करार परस्पर समता व परस्पर हित यावर आधारित आहे. या करारानुसार दोन्ही
संस्थामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पीक निवडीत मार्गदर्शन, शेती
पिकांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, बाजारपेठेची ओळख व मागणीनुसार
उत्पादने सुधारित करणे, परभणी जिल्ह्यातील कृषि उत्पादनांचे राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सादरीकरण, गुंतवणूकदार व खरेदीदारांना शास्त्रज्ञ व
उत्पादकांशी थेट संपर्क साधण्यासाठी सुविधा, विद्यापीठातील तांत्रिक प्रगतींचे
व्यावसायीकरण, विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे आदी क्षेत्रात
परस्पर सहकार्य करणार आहेत.
विद्यापीठ 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेल्या या महत्त्वपूर्ण करारामुळे मराठवाड्यातील
शेतकऱ्यांना शाश्वत शेती उत्पादन घेता येईल आणि अधिक उत्पन्न मिळविता येईल,
असा विश्वास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी व्यक्त केला.
या करारामध्ये हळद, सोयाबीन, ज्वारी, ऊस, तूर, हरभरा, ड्रॅगन फ्रूट,
मिरची, मोरिंगा, कापूस,
दूध व अंडी उत्पादनातील गुणवत्ता सुधारणा, अन्नप्रक्रिया
व पोषणयुक्त पदार्थ निर्मिती अशा विविध क्षेत्रातील ३२ उत्पादन व प्रकल्पांचा
समावेश करण्यात आला आहे.
या करारावर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि आयएमसी
(IMC) चेंबर ऑफ
कॉमर्स अँड इंडस्ट्री, मुंबई तर्फे अध्यक्ष व ओम्नीॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीजचे
व्यवस्थापकीय संचालक श्री संजय मारीवाला यांनी
स्वाक्षरी केली. यावेळी आयएमसीच्या इलेक्ट
अध्यक्ष श्रीमती सुनीता रामनाथकर, इलेक्ट उपाध्यक्ष श्री.
एम. के. चौहान, महासंचालक श्री. अजीत
मंगरूळकर आणि एफ २ एफ (F2F)कॉर्पोरेट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा असोचॅमचे सह-अध्यक्ष डॉ. उमेश कांबळे यांची उपस्थिती होती.