Pages

Wednesday, August 20, 2025

वनामकृवित सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञानावरील एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा संपन्न

 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करावा- माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि लक्ष्मी नृसिंह शुगर्स अमडापूर ता.जि.परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मंगळवारी,१९ ऑगस्ट रोजी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. तर विशेष अतिथी म्हणून विधानसभा सदस्य तथा कार्यकारी परिषद सदस्य मा.आमदार डॉ.राहुल पाटील यांनी उपस्थिती दर्शविली. व्यासपीठावर विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, लक्ष्मी नृसिंह शुगरचे वरिष्ठ संचालक श्री नचि जाधव, विद्यापीठाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रशांत देशमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, लक्ष्मी नृसिंह शुगरचे मुख्य व्यवस्थापक श्री सुभाष सोलव, शेतकी अधिकारी श्री तुळशीरामजी अंभोरे, ऊस विकास अधिकारी समर्थ कारेगावकर, ऊस पुरवठा अधिकारी नवनाथ कऱ्हाळे आणि विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाद्वारे आयोजित अशा कार्यशाळेत सहभाग घेऊन सर्वांनी शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अशा कार्यशाळेचा फायदा सर्वसामान्यांना होईल आणि तरच कार्यशाळेचा उद्देश सफल होईल. भविष्यातही कारखान्यांच्या सहकार्याने विद्यापीठ अशा कार्यशाळा वेळोवेळी आयोजित करून सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. आमदार डॉ.राहुल पाटील हे यावेळी बोलताना म्हणाले की विद्यापीठच्या ज्ञानाचा उपयोग अशा कार्यशाळेद्वारे केल्यास नक्कीच याचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना होईल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच या कार्यशाळेद्वारे सर्व प्रक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपले ऊस लागवड तंत्रज्ञान विषयीचे ज्ञान अधिक भक्कम करावे असे आवाहन यावेळी डॉ.पाटील यांनी केले.

यावेळी या कार्यशाळेत डॉ.गजानन गडदे यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, डॉ.आय.ए.बी.मिर्झा यांनी ऊस लागवडीच्या विविध पद्धती, डॉ.हरिहर कौसडीकर यांनी ऊस पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, डॉ. हरीश आवारी यांनी ऊस पिकातील पाणी व्यवस्थापन, डॉ.प्रफुल्ल घंटे यांनी ऊस पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन आणि डॉ.दिगंबर पटाईत यांनी ऊस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यशाळेत सहभागी प्रक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले. तसेच, शेतकी अधिकारी श्री. तुळशीरामजी अंभोरे यांनी सदरील कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिपाली सवंडकर यांनी केले. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथील कर्मचारी व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स, अमडापूरच्या ४७ प्रक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.