Pages

Wednesday, October 1, 2025

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा पुढाकार : पिक संरक्षण व रब्बी हंगाम नियोजनासाठी विशेष मोहीम

दैनंदिन गरजेनुसार पिकानिहाय पुढील तीन ते चार दिवसांसाठी सल्ला द्यावा.....माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

सततच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील फार मोठा भाग प्रभावित झाला आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून मातीचा सुपीक थर वाहून गेला आहे. अनेक कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंसह जनावरांची हानी झाल्याचे जाणवत आहे. सध्या खरीप पिके धोक्यात असताना रब्बी हंगामही जवळ आला आहे. अशा परिस्थितीत तग धरून राहिलेल्या पिकांचे संरक्षण आणि रब्बी हंगामाचे नियोजनाची आवश्यकता आहे.

यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाद्वारे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठाचे तीनही संचालक, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांची ऑनलाइन बैठक दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीत मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे तग धरून असलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आणि रब्बी पिकांचे नियोजानासाठी तांत्रिक सल्ला, मार्गदर्शनासह उपलब्ध साधन सामुग्री, शेती अवजारे पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या शेतावर जावून मार्गदर्शन करणार आहेत.

यासोबतच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांना कडक सूचना देत सुट्टीचा विचार न करता २४ तास मुख्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश दिले. या सर्व कार्याचा आढावा ते नियमितपणे ऑनलाइन माध्यमातून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार पिकानिहाय पुढील तीन ते चार दिवसांसाठी मार्गदर्शक सूचना देणे तसेच सद्यस्थितीत आकस्मिक पीक आराखडा तयार करून उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी बोलताना संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी खरीप पिकांची योग्य काळजी घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देणे, तसेच मातीची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, असे सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नमूद केले की सध्या शेतजमिनीवरील साचलेले पाणी बाहेर काढणे किंवा निचरा करणे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे पिकांमध्ये कोणतीही मशागत करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत तग धरून राहिलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला अवलंबवावा असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विद्यापीठाची कृषि  विस्तार यंत्रणा राज्य शासनाच्या कृषि  विभागाबरोबरच विविध अशासकीय व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाने ठरविलेले कार्य प्रभावीपणे पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.

याबरोबरच माननीय कृषिमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माननीय कुलगुरू यांच्या पुढाकाराने विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संमतीने एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस विद्यापीठाचे नियंत्रक श्री. अनंत कदम, सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीचे नियोजन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी करून आभार मानले.