विद्यार्थ्यांनी प्लॅन बी तयार ठेवावा, कौशल्यविकासावर भर द्यावा — माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालयात शैक्षणिक
वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ
समारंभ, पालक मेळावा आणि माजी गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान
सोहळा दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आणि उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण माजी आयुक्त
(महसूल)माननीय श्री. सुनील केंद्रेकर, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, तसेच महिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रितेश
मिश्रा हे होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, शिक्षण प्रभारी डॉ.रणजित चव्हाण, जिमखाना उपाध्यक्ष डॉ.
रावसाहेब भाग्यवंत, प्रभारी शिक्षण डॉ. दिलीप झटे, डॉ. मकरंद भोगावकर आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाविद्यालयीन
जीवन हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासाचे सुवर्ण पान आहे. या काळात
मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर उपयोग करा, कारण हाच काळ तुमच्या भविष्याचा पाया
रचतो. त्यांनी पुढे सांगितले की, या पदवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
देश-विदेशात संशोधन, उद्योगधंदे, व्यवसाय,
स्टार्टअप्स, तसेच नवोन्मेषाच्या क्षेत्रात अपार
संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिज्ञासा आणि
कष्टाची तयारी या तीन गुणांच्या आधारे यशाचा मार्ग घडवावा, असे
सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रचंड उत्साह आणि सकारात्मकतेने पुढे जाण्यासाठी प्रेरित
केले. सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे
नुकसान झाल्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठ या
कठीण काळात शेतकरी बांधवांसोबत पूर्ण मनापासून सामील आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे राहणे हीच विद्यापीठाची खरी ताकद आहे, असे त्यांनी ठामपणे
नमूद केले. तसेच, विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि विस्तार अधिकारी
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्यांचे तांत्रिक निराकरण करण्यासाठी
सातत्याने प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी
सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना सामाजिक बांधिलकी जपत “शेती, शास्त्र आणि समाज” या त्रिसूत्रीवर कार्य करण्याचे आवाहन केले.
माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले की, जीवनात नेहमी
‘प्लॅन ए’ बरोबरच ‘प्लॅन बी’ तयार ठेवा. सध्याच्या काळात स्पर्धा प्रचंड वाढली आहे
आणि सरकारी नोकऱ्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे केवळ नोकरीच्या शोधात
न राहता स्वतःचे कौशल्य वाढवून उद्योजकतेकडे वळणे हे काळाचे मोठे आव्हान आणि संधी दोन्ही
आहे. ते पुढे म्हणाले की, आपण ज्या क्षेत्रात आहात त्या
क्षेत्रातील सखोल ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रगत
तंत्रज्ञानाचे ज्ञान हे यशाची गुरुकिल्ली आहे. स्किल डेव्हलपमेंट, नवोन्मेष (Innovation) आणि आत्मविश्वासाच्या बळावर युवकांनी
स्वतःची दिशा ठरवावी. शासकीय योजनेद्वारे मिळणाऱ्या प्रशिक्षण, स्टार्टअप आणि स्वावलंबनाच्या संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
माननीय श्री. सुनील केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व
पटवून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहाराचे
महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, “तंदुरुस्त शरीरातच निरोगी
मन व यशस्वी जीवन नांदते.”
माननीय डॉ.
भगवान आसेवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमात तसेच परीक्षा पद्धतीत
झालेल्या आमूलाग्र बदलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच, ‘अ’ दर्जा प्राप्त
विद्यापीठातील मराठवाड्यातील पहिल्या कृषि महाविद्यालयात प्रवेश मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी
अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
केले.
श्री. रितेश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि स्टार्टअप्सच्या वाढत्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की,
आधुनिक कृषिक्षेत्र आणि उद्योगजगतामध्ये AI चा
वापर झपाट्याने वाढत आहे. नव्या कल्पना आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून युवकांना रोजगारनिर्मितीच्या
अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
प्रास्ताविक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. डॉ.रणजित चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना
महाविद्यालयाची माहिती, विविध विभागांची ओळख आणि नियमावली सांगितली.
कार्यक्रमात मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते
सत्कार मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. एफ एस खान व डॉ धीरज पाथ्रीकर
यांनी केले तर आभार डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी मानले.