Pages

Saturday, November 15, 2025

कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी : वनामकृविच्या कृषी संवादाचा ७२ वा भाग उत्साहात


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून, तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी (नांदेड-२) यांच्या समन्वयातून “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद” या उपक्रमाचा ७२ वा भाग कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी” या विषयावर दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी भरडधान्यांसह विविध पिकांच्या मूल्यवर्धनासाठी लघु व सूक्ष्म उद्योग उभारणीचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामीण भागातील युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ, बाजारपेठेतील वाढती मागणी आणि पोषणमूल्य वाढविण्यासाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग कसे प्रभावी ठरतात, याबद्दल त्यांनी ठोस उदाहरणांसह माहिती दिली.

आभासी माध्यमाद्वारे ४० हून अधिक शेतकरी, महिला व उद्योजक यांनी सहभाग घेतला. संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले व तज्ञ मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास तसेच प्रक्रिया उद्योगातील नव्या संधी समजून घेण्यास मदत झाली.

या संवाद उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसोबतच मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगातील संधी यांची माहिती मिळाली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ (कृषि विस्तार) यांनी केले. त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. तसेच त्यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सहभागी शेतकरी बांधवांचे स्वागत केले व पुढील उपक्रमातही सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे अधिकारी तसेच कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.