Pages

Wednesday, November 26, 2025

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त हमारा संविधानया संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहूल रामटेके होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच आजच्या पिढीवर असलेली जबाबदारी या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगत लोकशाही मजबूत करण्यासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी एका आवाजात उद्देशिका वाचताना संविधानाबद्दलची निष्ठा आणि आदर व्यक्त झाला.

यानंतर महाविद्यालय परिसरात एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फलक, संदेशफलक आणि संविधान मूल्यांवर आधारित स्लोगन्स घेऊन परिसरात जागृतीचे संदेश दिले. रॅलीदरम्यान संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू”,“बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान”,“भारताचा अभिमान भारताचे संविधान”,“संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमानअशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या घोषणांमध्ये देशभक्ती, समानता आणि संविधानाबद्दलचा अभिमान स्पष्ट जाणवत होता.

कार्यक्रमास डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अश्विनी गावंडे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक व कर्मचारी यांचेही सहकार्य लक्षणीय होते.

यानंतर संविधान आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये संविधान रचना, महत्त्वाच्या कलमे, मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत अचूक उत्तरे देत संविधान अभ्यासाविषयीची जाण दाखवली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात सर्व व्यवस्थापन, रॅलीचे नियोजन आणि प्रश्नमंजुषेची अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळेच सुरळीत पार पडली. कार्यक्रमाचा समारोप जयघोषात करण्यात आला.