Pages

Friday, December 19, 2025

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतून महिलांना उद्योजकतेची संधी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित परभणी जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयातील सामायिक उष्मायन केंद्र (Common Incubation Centre) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) स्थापनेमागील उद्दिष्टे व कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेतला. भारत सरकार व महाराष्ट्र शासनामार्फत महिला शेतकऱ्यांच्या कल्याण व सक्षमीकरणासाठी विविध विशेष योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजक होण्यासाठी दृढ संकल्पासोबत सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात. प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्मिती करताना त्यांचे दर्जेदार व प्रभावी विपणन कसे करता येईल, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या मूलभूत प्रशिक्षणानंतर ‘प्रशिक्षण २.०’ घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढे महाराष्ट्र शासन, आत्मा यंत्रणा व विद्यापीठ यांनी संयुक्तपणे कार्य करून एक विशिष्ट कार्यक्षम मॉडेल विकसित करावे, असे त्यांनी सूचित केले. या मॉडेलअंतर्गत काही प्रशिक्षणार्थी प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्मिती करतील, तर काही प्रशिक्षणार्थी त्या उत्पादनांचे प्रभावी विपणन करतील. शेतापासून थेट ग्राहकापर्यंत प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी मजबूत व शाश्वत पुरवठा साखळी निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विद्यापीठाचे माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हे प्रशिक्षण कार्यक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. आत्मा प्रकल्पाचे संचालक श्री. दौलत चव्हाण यांनी प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या बाजारपेठेची व्याप्ती मोठी असून या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगून महिला बचत गटांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्रशिक्षण समन्वयक डॉ. विजया पवार, परभणीचे तालुका कृषी अधिकारी श्री. विजयकुमार नांदे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आत्मा प्रकल्पातर्फे श्री. पी. पी. रेंगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, परभणी आणि श्री. एस. यू. हूगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, सेलू यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून कार्य केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आवळा, केळी व सोयाबीन यांपासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ — जसे की आवळा मुरंबा, आवळा लोणचे, केळीचे चिप्स, केळीची पावडर, सोयाबीन स्नॅक्स इत्यादी — तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण महिला बचत गटांना महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती घोडके, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा प्रकल्प, परभणी यांनी केले, तर आभार डॉ. राजेश क्षीरसागर मानले.