Pages

Saturday, April 12, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली मसाला पिकांचे यांत्रिकीकरण व निर्यात संधींवर भर – वनामकृवित विशेष प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातर्फे "एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान" अंतर्गत मसाला पिके व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद बोरगड हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, प्रमुख अन्वेषक डॉ. विश्वनाथ खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मसाला पिकांमध्ये यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी  निर्मिती, काढणीपश्चात व्यवस्थापन व परदेशी निर्यातीच्या संधींबाबत भर दिला. प्रशिक्षणातील महिलांचा सहभाग विशेष कौतुकास्पद असून, अशा प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्वीकारून उत्पन्नवाढ साधावी, असे ते म्हणाले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मसाला पिकांचा इतिहास उलगडून सांगत शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रास्ताविक विभाग प्रमुख व प्रमुख अन्वेषक डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली.

तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेश क्षीरसागर यांनी मसाला पिकांचे मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन केले. डॉ. सचिन मोरे यांनी हळद पीकाचे अर्थकारण, विपणन व ई – नाम (E-NAM) प्रणाली, डॉ. अनिल ओळंबे यांनी हळद पीक लागवड, डॉ. दिगंबर पटाईत यांनी किड व्यवस्थापन, तर डॉ. आनंद दौंडे यांनी रोग व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.

श्री. प्रल्हाद बोरगड यांनी सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना, विकास आणि त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. जनार्धन आवरगंड यांनी शेतकरी गटांमार्फत मूल्यवर्धन व विक्री व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. महिला शेतकरी श्रीमती अलका डोळसे व मुक्ता झाडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सूक्ष्म व लघुउद्योगातून स्वयंपूर्णता मिळवण्याचे प्रेरणादायी अनुभव शेअर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन कु. निकिता दापूरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. ए. एम. भोसले, डॉ. एस. जे. सय्यद, डॉ. पंकज जावळे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या प्रशिक्षणात रेगाव, धोत्रा, आडगाव (रंजेबुवा), माकणी, मांडाखळी, मिरखेल, शेंद्रा आदी गावांतील सुमारे १२५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत, अशी मागणीही यावेळी व्यक्त केली.
















परभणी कृषि विद्यापीठाचा करडई संशोधनात मोठा यशस्वी टप्पा – 'परभणी सुवर्णा' आणि 'पीबीएनएस १८४' वाणांना देशपातळीवर क्षेत्रवाढीस मान्यता

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधनात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत देशपातळीवर क्षेत्रवाढीस दोन नव्या करडई वाणांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) व पीबीएनएस १८४ या वाणांना केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता, वाण अधिसूचना व प्रसारण समिती (CSC on CSN & RV) च्या ९३व्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

या वाणांना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये (झोन-१) लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असून, पीबीएनएस १८४ वाणाला झोन-२ अंतर्गत इतर प्रमुख करडई उत्पादक राज्यांमध्येही लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे. माननीय कुलगुरूंनी सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना सांगितले की, या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तापूर्ण करडई वाण मिळतील, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीदेखील टीमचे अभिनंदन करत सांगितले की, या वाणांचे बियाणे लवकरच राष्ट्रव्यापी स्तरावर उत्पादनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध होतील, जे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देतील.

या वाणांच्या विकासामध्ये डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) या वाणाला ६ मार्च २०२३, तर पीबीएनएस १८४ वाणाला ३१ ऑगस्ट २०२२ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

या नव्या वाणांचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, हे वाण देशातील करडई उत्पादनामध्ये एक नवीन अध्याय उघडतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

वाणांची वैशिष्ट्ये

 

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) -

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणाऱ्या पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हा वाण  १२४ ते १२६ दिवसांत परिपक्व होत असून याचे कोरडवाहू मध्ये उत्पादन १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते. या वाणाचे तेलाचे प्रमाण सुमारे ३०.९० टक्के असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे. या वाणाच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये मावा कीडीस प्रतिकारक्षमता, पानावरील ठिपके व मर रोगांवरील सहनशीलता आहे.

 

पीबीएनएस १८४ -

कोरडवाहू क्षेत्रात १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारा पीबीएनएस १८४ हा नवा वाण बागायती भागात १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के इतके असून, १२० ते १२४ दिवसांमध्ये परिपक्व होतो. यामध्ये विशेष बाब म्हणजे, मर/उबळी रोगास व मावा कीडीस प्रतिकारक्षम, पानावरील ठिपके रोगास सहनशील आहे. 

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा)

पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा)

पीबीएनएस १८४

पीबीएनएस १८४



Thursday, April 10, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा प्रेरणादायी सत्कार सोहळा – विज्ञान आणि समाजसेवेचा संगम

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी तसेच जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्रामजी पवार यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात दिनांक ०९ एप्रिल रोजी पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि भूषण श्री कांतरावकाका देशमुख झरीकर, श्री हरीश कुलकर्णी, श्री सतीश देशमुख तसेच परभणीचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रामेश्वर नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पद्मश्री चैत्रामजी पवार यांच्या कार्याचा गौरव करत विज्ञानवादी विचारसरणीला चालना देणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विज्ञानप्रिय समाज घडवण्याचे कार्य भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाईल. डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात या कार्यास नवी दिशा मिळेल.

पद्मश्री चैत्रामजी पवार यांची प्रकट मुलाखत डॉ. जगदीश नाईक आणि श्री विजय नरवाडे यांनी घेतली. यामध्ये मा. चैत्रामजी पवार यांनी जंगल क्षेत्रात वृक्षतोडीला आळा घालण्याच्या उपाययोजना, स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी, तसेच “जन, जमीन, जल, जंगल आणि जनावरे” या पंचसूत्री तत्वावर आधारित आपल्या कार्याचा सविस्तर आढावा दिला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. के. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला परभणी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम समाजसुधारणेच्या दिशेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा ठरला असून, विज्ञान आणि सामाजिक विकास यांचा समन्वय साधणारी ही पर्वणी नागरिकांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली.









पंचसूत्री परिवर्तनाची दिशा: पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासोबत वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात प्रेरणादायी चर्चासत्र

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून, संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांच्या पुढाकारातून तसेच परभणी अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी व जनकल्याण सेवा संस्था यांच्या सहकार्याने मौजे बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील नामवंत सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. श्री. चैत्रामजी पवार यांच्याशी विशेष चर्चासत्राचे आयोजन दिनांक ०९ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक यांची विशेष उपस्थिती होती.  

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मा. पवार यांचे स्वागत करताना जन, जमीन, जल, जंगल आणि जनावरे या पंचसूत्रीचा उल्लेख केला आणि असे सांगितले की, या क्षेत्रात काम करणे हे खूप आव्हानात्मक असून मा. पवार यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा देशाने गौरव करून पद्मश्री पुरस्कार दिला, याचा विद्यापीठासही अभिमान आहे. अशा महान व्यक्तिमत्वास परभणी येथील सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची त्यांची भेट करून आणली, याबद्दल विद्यापीठ आभार मानते. पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण, सौरऊर्जा, पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, मा. पवार यांचे अनुभव विद्यापीठाच्या भावी पर्यावरणीय योजनांमध्ये मार्गदर्शक ठरतील.

चर्चासत्रात पद्मश्री मा. श्री. चैत्रामजी पवार यांनी आपला अनुभव मांडताना सांगितले की, सुरुवातीस जंगलसंवर्धनातून सुरुवात करत केंद्र शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर केला. मोहाच्या फुलांपासून साबण, तेल, मद्य, मनुके आदी प्रक्रिया उद्योग उभारले. मोहाच्या एका झाडापासून किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. ते पुढे म्हणाले, जवळपास ४४ गावांमध्ये आमचे कार्य विस्तारले आहे, आणि दोन लाखांहून अधिक मोहाची झाडे ही त्या परिसरातील समृद्धीचे प्रतीक आहे.

तसेच त्यांनी पारंपरिक धान्यांच्या संवर्धनावर भर दिला. नागली, वरई, भगर, राळ या पोषक धान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करून बियाणे संवर्धन आणि शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने काम केले आहे. “संवादातून संपर्क, आणि संपर्कातून संघटन निर्माण होते – हे सूत्र अंगीकारल्यामुळेच आमच्या कार्यात यश मिळाले,” असेही त्यांनी नमूद केले.

त्यांना वनसंवर्धन व वन्यजीव रक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला “महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी पद्मश्री मा. पवार यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. आनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण कापसे यांनी मानले.

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कर्मचाऱ्यांना पदोन्नती – विद्यापीठात आनंदाचे वातावरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली असून, विद्यापीठात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या  नेतृत्वाखाली आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली.

विद्यापीठात मंजूर पदापैकी जवळपास ६० टक्के पदे रिक्त आहेत, ज्यामुळे शिक्षण, संशोधन, आणि विस्तार कार्यांवर परिणाम होत आहे. तसेच  कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदोन्नती प्रक्रियेद्वारे रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाद्वारे केला जात आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन, शिक्षण, संशोधन व विस्तार विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. दीर्घ काळापासून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या आणि शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता असलेल्या तसेच  त्यांच्या योगदानाची दखल घेत कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पदांवर ही पदोन्नती करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, ही पदोन्नती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असून, भविष्यातही ते विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राहतील, असे मत व्यक्त केले.

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यक्षमता व उत्साहात वाढ होईल, असा विश्वास कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच ते म्हणाले की, ही पदोन्नती केवळ वैयक्तिक प्रगती नाही, तर विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचेही प्रतीक आहे. येणाऱ्या काळातही कर्मचाऱ्यांना अश्याच संधी मिळातील असे त्यांनी नमूद केले.

पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप कुलसचिव श्री पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव श्री राम खोबे, कक्ष अधिकारी श्री. गंगाधर चांदणे, श्री. नरेंद्र खरतडे आणि कुलसचिव कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेवून यशस्वी पार पाडली.

पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक १८, कनिष्ठ संशोधन सहाय्यक ते सहाय्यक प्राध्यापक – १४, सहाय्यक कक्ष अधिकारी ते कक्ष अधिकारी – ३, वरिष्ठ लिपिक ते सहाय्यक कक्ष अधिकारी – ७, वर्ग चार मधून कृषि सहाय्यक – ४, कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक – २०, मजूर किंवा वर्ग चार मधून कनिष्ठ लिपिक – २२ असे एकूण ८८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून, विद्यापीठ प्रशासनाने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले जात असून, पुढील काळात अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पदोन्नतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Wednesday, April 9, 2025

कृषि महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडा सादरीकरणाचा भव्य कार्यक्रम

 महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजेत... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडा सादरीकरणाचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक ९ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)  इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच लोकशाहीर श्री. रणजित आशा अंबाजी कांबळे (प्रबोधनात्मक शाहिरी जलसा, कोल्हापूर) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरूंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत, महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजेत, असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या बाबासाहेबांच्या विचाराची आठवण करून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत, बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. सी. भाग्यवंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते लोकशाहीर श्री. रणजित कांबळे यांच्या 'महामानवांना समर्पित शाहिरी पोवाडा'. त्यांच्या जोशपूर्ण, स्फूर्तिदायक आणि विचारप्रवर्तक सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले आणि उपस्थितांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा नवा उत्साह निर्माण केला.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल व डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली गठित संयोजन समितीने केले. या समितीत अध्यक्ष प्रेम कांबळे, उपाध्यक्ष गजानन येळणे, सचिव गौरव मानतुटे आणि कोषाध्यक्ष नागेश वसमतकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बळीराजाच्या बांधावर – १७ गावांमध्ये ३२५ शेतकऱ्यांशी थेट संवाद

 बदलत्या हवामानानुसार पिकांची लागवड करावी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत" हा अभिनव उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दिनांक ९ एप्रिल रोजी यशस्वीरित्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १३ शास्त्रज्ञांच्या चमूमधील ३४ शास्त्रज्ञांनी १७ गावांमध्ये ३२५ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, आणि शेतकरी मेळावे घेतले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानासह हवामान बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

परभणी तालुक्यातील मौजे देशमुख पिंपरी येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर, गावचे उपसरपंच श्री. नागेशराव देशमुख आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी तुरीच्या वाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढले यावर भर दिला. सोयाबीनचे एमएयुएस ७२५ व ७३१ हे वाण शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असून हवामान बदल लक्षात घेता अधिक तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती विद्यापीठ करत आहे, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बदलत्या हवामानानुसार पिकांची लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी येणाऱ्या १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये विविध विषयांचे तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान कसे आत्मसात करता येईल हे स्पष्ट केले. विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी कापूस, तूर, सोयाबीन व हळदीच्या लागवडीविषयी तर सहयोगी प्राध्यापक (उद्यान विद्या) डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी भाजीपाला व फळबाग लागवडीविषयी माहिती दिली. कीड व्यवस्थापनाबाबत सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रगतिशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर आणि श्री. सोपान माने यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी.डी. पटाईत व श्री. विश्वनाथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी.डी. गडदे यांनी केले.

प्रगतशील शेतकरी श्री. सोपान माने यांच्या एकात्मिक शेती पद्धतीचा मान्यवरांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्र दौऱ्याद्वारे आढावा घेतला. त्यांच्या फळबाग, कोंबडी पालन आणि महोगनी वृक्ष लागवडीचे विशेष कौतुक करण्यात आले.

या उपक्रमात मराठवाड्यातील विद्यापीठाच्या विविध विभागांतील शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कृषी तज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, किटकशास्त्र विभाग, कृषि विस्तार शिक्षण विभाग, कृषि अभियांत्रिकी विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व फळ संशोधन केंद्र,  तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि खामगाव (ता. गेवराई) येथील कृषि विज्ञान केंद्रे, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी, अंबाजोगाई, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे, येथील या कार्यालयातील शास्त्रज्ञानी त्यांच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार आणि समस्येनुसार मार्गदर्शन केले.

यावेळी सहयोगी संचालक डॉ सूर्यकांत पवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. वीणा भालेराव, सहयोगी कृषी विद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी, प्रा. अरुण गुट्टे, शास्त्रज्ञ डॉ. बी.एम.कलालबंडी, डॉ. वर्षा मारवळीकर, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजूला भावर, डॉ. एस डी सोमवंशी, डॉ. दीपक कच्छवे, डॉ. संजय पवार, डॉ. हनुमान गरुड, श्रीकृष्ण झगडे, किशोर जगताप, रामेश्वर ठोबरे, डॉ अश्विनी बिडवे आदी प्रमुख शास्त्रज्ञांचा सहभाग होता.