Thursday, December 18, 2025

शेतकरी देवो भव: संकल्पनेतून शेतकरी-केंद्रित, शाश्वत व उद्योजक शेतीकडे वाटचाल – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या खामगाव येथील केव्हिकेद्वारा आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिकांतर्गत ईट (बीड) येथे तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि  विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई, जि. बीड), महाबीज बीड, कृषि  विभाग, आत्मा तसेच पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी बीड तालुक्यातील मौजे ईट येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि लाभले, उद्घाटक गोरक्षनाथ टेकडीचे महंत हभप नवनाथ बाबा तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, जिल्हा अधीक्षक कृषि  अधिकारी (बीड) श्री सुभाष साळवे, महाबीजचे जालना येथील विभागीय व्यवस्थापक श्री राजाभाऊ मोराळे, तसेच महाबीज बीड जिल्हाचे व्यवस्थापक श्री अजय फुलझेले हे होते.  प्रमुख उपस्थितीमध्ये इटचे सरपंच श्री गणपत डोईफोडे, उपविभागीय कृषि  अधिकारी श्री उद्धव गर्जे, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे तसेच डॉ गिते  हे लाभले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बदनापूर येथील कृषि  संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक पाटील, कृषि  विस्तार विद्यावेता प्रा. अरुण गुट्टे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे कार्य शेतकरी देवो भव:” या भावनेतून सुरू असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक व शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी मजबूर नव्हे तर मजबूत झाला पाहिजे, यासाठी संशोधन, तंत्रज्ञान व विस्तार कार्याच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकरी महिलांनी पुढे येऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी, महिलाशक्तीच्या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकरी केवळ उत्पादक न राहता शेतकरी उद्योजक बनला पाहिजे, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठेशी थेट जोड निर्माण करून उत्पन्नवाढ साधता येईल, असे मत माननीय कुलगुरूंनी व्यक्त केले. विद्यापीठ शेतकरी-केंद्रित संशोधन व प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी-केंद्रित विस्तार कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत शेती पद्धती व उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. दिपक पाटील यांनी तूर पिकाचे सद्यस्थितीतील महत्त्व स्पष्ट करत पिक व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. महाबीजचे श्री. मोराळे यांनी बियाणे, बीजोत्पादन प्रक्रिया तसेच महाबीज निर्मित विविध उत्पादनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच श्री. सुभाष साळवे यांनी कृषि महाविस्तार ॲप विषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देत त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजावून सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. यावेळी शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त करताना तूर पिकाच्या एसओपीवर आधारित गीत सादर केले तसेच तूर पिकाचे नियोजन, लागवड व व्यवस्थापनाबाबत आपले अनुभव मांडले.

यानंतर श्री. रामप्रसाद डोईफोडे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक तूर शेतीची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी प्रा. अरुण गुट्टे यांनी तूर पिकाच्या विविध टप्प्यांवरील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन महाबीजच्या क्षेत्र अधिकारी कविता देवढे यांनी केले तर आभार प्रा. किशोर जगताप यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रगतशील शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे, कृषि  विज्ञान केंद्राचे डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, श्री. गजेंद्र आढावे, श्री. दत्तप्रसाद वीर, श्री. विजयकुमार चांदणे, महाबीज, कृषि विभाग तसेच पानी फाउंडेशनचे श्री. महेश लाखे, श्री. संतोष शिनगारे, शिवलेश्वर मेदने व विशाल घोलप यांनी अथक परिश्रम घेतले.












वनामकृवि येथे ‘अविष्कार संशोधन महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न 


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे अविष्कार संशोधन महोत्सव २०२५–२६ चे आयोजन दि. १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि  अशा एकूण २५ विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग नोंदविणार आहेत.

या महोत्सवासाठी सुमारे ६०० संशोधक विद्यार्थी व ६०० संशोधक विद्यार्थिनी, तसेच २०० संघ व्यवस्थापक/संचालक विद्यार्थी कल्याण आणि १०० परीक्षक अशा एकूण १५०० जणांच्या निवास व भोजन व्यवस्थेची आवश्यकता भासणार आहे.

या महोत्सवात संशोधन स्पर्धा, बक्षीस वितरण तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी लोकभवन कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मान्यतेने विद्यापीठस्तरीय विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समित्यांच्या कार्यांचा आढावा घेण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी प्रत्येक समितीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उच्च दर्जाचे व शिस्तबद्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. विद्यापीठात बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवर, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व पाहुण्यांच्या सोयी, काळजी व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विद्यापीठाच्या संशोधनात्मक कार्याची व पायाभूत सुविधांची ओळख होण्यासाठी संशोधन केंद्रे व परिक्षेत्रांना भेटी आयोजित करण्याचेही त्यांनी विशेषतः सूचित केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हा संशोधन महोत्सव विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण, बुद्धीला चालना देणारा-सर्जनशील व उपयुक्त संशोधनाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरणार असून त्यांच्या संशोधन क्षमतेला योग्य दिशा व प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग नोंदवून आपले संशोधन कार्य प्रभावीपणे सादर करावे, असे आवाहन केले.

या बैठकीचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. बैठकीदरम्यान त्यांनी विविध समित्यांच्या सदस्यांना नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण व संपूर्णतः समर्पण भावनेने कार्य करून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले तसेच प्रत्येक समितीची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले. या बैठकीस सर्व समित्यांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.





वनामकृवित बदलत्या हवामानात पीक संरक्षणावर राष्ट्रीय परिसंवादाचा यशस्वी समारोप

रोगशास्त्र व कीटकशास्त्र विभाग वेळेवर निदान करून अल्प खर्चातील प्रभावी उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण व शाश्वत वनस्पती आरोग्यया विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद (इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी – पश्चिम विभाग) चा समारोप झाला. या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन परभणी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग, नवी दिल्ली इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी व असोसिएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजिस्ट्स (इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माननीय माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, उपस्थित होते. व्यासपीठावर आयसीएआर–आयएआरआय, नवी दिल्ली येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या माजी संचालक तथा डाळिंब रोग शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अकोला येथील कृषी वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. बी. टी. राऊत, परिसंवादाचे संयोजक डॉ. विक्रम घोळवे व सहसंयोजक डॉ. गजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात नुकताच विद्यापीठास प्राप्त झालेल्या ‘वेटरन्स इंडिया – प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ या मानाच्या पुरस्काराबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व विद्यापीठाचा इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS), कृषि वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघ तसेच विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, विभाग व कार्यालयांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरा, दर्जेदार शिक्षण, संशोधन व शेतकरी-केंद्रित विस्तार कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत पीक संरक्षण व शाश्वत कृषी विकासासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असून, या राष्ट्रीय परिसंवादातून प्राप्त शिफारशींवर आधारित बहुविषयक व उपयुक्त संशोधन हाती घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. कृषी वनस्पती रोगशास्त्र व कीटकशास्त्र विभागांद्वारे किडी व रोगांचे वेळेवर निदान करून अल्प खर्चात प्रभावी उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पोकरा, स्मार्ट प्रकल्प व ‘महाॲग्री’ अ‍ॅपमुळे महाराष्ट्र कृषी विकासासाठी दिशादर्शक राज्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत, विद्यार्थिनींच्या वाढत्या यशाचा उल्लेख त्यांनी केला. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रोगशास्त्र विभागाचे अभिनंदन करून, अद्ययावत सुविधा वापरून दर्जेदार व शेतकरीहिताचे संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माननीय माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले की या विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने विविध पिकांसाठी रोगप्रतिकारक वाणांच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. सध्या अन्नधान्य व फळपिकांचे उच्च उत्पादन घेतले जात असले तरी त्यासोबत काही गंभीर समस्या देखील निर्माण होत आहेत. उत्पादनात वाढ होत असताना साठवणूक प्रक्रियेपर्यंत अन्नधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे दिसून येते. या नासाडीवर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे व त्यावर सखोल संशोधन करणे अत्यावश्यक आहे. यासोबतच संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व शास्त्रज्ञांनी आपले तंत्रज्ञान व संशोधन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आयोजकांचे अभिनंदन करताना सांगितले की, या परिसंवादातून विषयानिहाय महत्त्वपूर्ण शिफारशी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबतचे संवाद सत्र अत्यंत प्रभावी ठरले असून, त्यातून संशोधनासाठी योग्य दिशा मिळेल. या दिशेने संशोधनात सातत्य ठेवून शेतकरीहित-केंद्रित कार्य करावे, असे त्यांनी सुचविले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांचे विद्यापीठातील इतर महाविद्यालये व विभागांनीही अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे यांनी परिसंवादाचा सविस्तर अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) तसेच रोगशास्त्रज्ञ संघटनेच्या प्रतिनिधींनी परिसंवादासाठी उपस्थित राहून दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रमुख वक्ते, सहभागी शास्त्रज्ञ व विद्यार्थी, विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा तसेच परिसंवादाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

परिसंवादामध्ये एकूण १३० शास्त्रज्ञ आणि १९० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सहभागी शास्त्रज्ञांनी लीड पेपर तसेच त्यांच्या संशोधनात्मक शोधनिबंधांचे सादरीकरण केले. या परिसंवादामध्ये एकूण नऊ प्रमुख विषय (Major Themes) होत्या. यामध्ये पीक संरक्षणासाठी हवामान-ताण सहनशील धोरणे, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापनातील प्रगती, वनस्पती रोग दमनासाठी मृदा आरोग्य व सूक्ष्मजीव परिसंस्थेची (मायक्रोबायोम) गतीशीलता, शाश्वत पीक व्यवस्थेसाठी कृषी-परिसंस्थात्मक (Agroecological) दृष्टिकोन, पीक संरक्षणातील उदयोन्मुख तंत्रज्ञान व डिजिटल नवकल्पना, वनस्पती आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रणाली, शाश्वत वनस्पती संरक्षणासाठी धोरणात्मक कार्यपद्धती व शेतकरी-नेतृत्वाखालील उपक्रम, वनस्पती आरोग्य व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी व सार्वजनिक–खाजगी भागीदारीचे बळकटीकरण, शाश्वत पीक व्यवस्थापनात सामाजिक जनजागृती व समुदाय सहभाग तसेच फळे व भाजीपाला पिकांचे एकात्मिक काढणोत्तर (Post-Harvest) व्यवस्थापन या विषयांचा सामवेश होता.

या परिसंवादातून शेतकरी हित केंद्रित तसेच भविष्यातील संशोधनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी मांडण्यात आल्या. या शिफारशींवर आधारित स्थलनिहाय (Location-specific) संशोधन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

परिसंवादात विविध विषयांनुसार सत्रांमध्ये मौखिक व भित्तिपत्रक सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच परिसंवादाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते संबंधितांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

परिसंवादाच्या यशस्वी आयोजनात वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, आयोजक सचिव (IPS–पश्चिम विभाग) व प्राध्यापक डॉ. विक्रम घोळवे, तसेच सह–आयोजक सचिव व प्राध्यापक डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. संदीप बडगुजर, डॉ. चंद्रशेखर आंबाडकर, डॉ. अनंद  दौंडे, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. संतोष वाघमारे, डॉ. संतोष  पवार, डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. दिलीपकुमार हिंगोले, डॉ. सुनिता मगर, डॉ. रवी चव्हाण, तसेच सर्व सहाय्यक कर्मचारी, पीएच.डी. व पदव्युत्तर (पी.जी.) विद्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समारोप कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















Tuesday, December 16, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स (HarvestPlus Solutions – HPS), वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) यांच्यात कृषि, पोषण व अन्नसुरक्षा क्षेत्रातील जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार नवी दिल्ली येथील द पार्क, कनॉट प्लेस येथे दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय पोषण व जैवपोषण विस्तार कार्यशाळेच्या निमित्ताने करण्यात आला.

या सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंदर ग्रोव्हर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत हार्व्हेस्टप्लस, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनासाठी सल्लागार गट (CGIAR) तसेच सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील भागीदारांकडून विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व उपाययोजनांचे विस्तार (स्केलिंग) व व्यावसायिकीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या सहकार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व दुर्बल घटकांचे उपजीविका स्तर उंचावणे तसेच जागतिक अन्न व पोषण सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाय विकसित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या करारामुळे कृषि व पोषण क्षेत्रात शाश्वत, दीर्घकालीन व अर्थपूर्ण परिणाम साधण्यास मदत होणार असून, देशासह जागतिक स्तरावर विशेषतः दुर्बल व वंचित समुदायांसाठी लाभदायी ठरणार आहे.

हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स ही वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे आधारित उद्देशप्रधान, जागतिक स्तरावरील नेटवर्क स्वरूपाची संस्था आहे. हार्व्हेस्टप्लस, CGIAR तसेच सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील भागीदारांकडून विकसित होणाऱ्या क्रांतिकारी नवकल्पनांचे प्रसारण, विस्तार व व्यापारीकरण वेगाने घडवून आणणे हा हार्व्हेस्टप्लसचा मुख्य उद्देश आहे. उपजीविका, जागतिक अन्न व पोषण सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जात, विशेषतः अतिसंवेदनशील लोकसमूहांच्या कल्याणासाठी जागतिक स्तरावर अर्थपूर्ण व शाश्वत परिणाम साधण्याचा हार्व्हेस्टप्लस प्रयत्न करते. भारतामध्ये हार्व्हेस्टप्लसने मुलांसाठी तीन दशलक्ष जेवणांचे वितरण करण्यास मदत केली असून ४,५०,००० पोषण साक्षरता प्रशिक्षणांचे आयोजन केले आहे.

जैवपोषक पिकांच्या विस्तारासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

देशातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेती विकास साधण्यासाठी जैवपोषक (Biofortified) पिकांचा मुख्य प्रवाहात समावेश करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स (HarvestPlus Solutions – HPS), वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) या जागतिक स्तरावरील नेटवर्क स्वरूपाच्या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथील द पार्क, कनॉट प्लेस येथे दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय पोषण व जैवपोषण विस्तार कार्यशाळा (National Nutrition and Biofortification Scaling Workshop) मध्ये ते पॅनेल चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन करीत होते. या कार्यशाळेत देशभरातील धोरणकर्ते, कृषी शास्त्रज्ञ, संशोधक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जैवपोषक पिकांच्या संशोधन, प्रसार व विस्तारात कृषि विद्यापीठांची भूमिका अधिक प्रभावी कशी करता येईल, याबाबत बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, कृषि विद्यापीठांनी सुधारित वाणांची चाचणी प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण करणे, ब्रीडर बियाणे उत्पादन वाढवणे तसेच प्रत्येक पिकासाठी शास्त्रशुद्ध कृषि पॅकेज विकसित करणे गरजेचे आहे. यामुळे प्राधान्य राज्यांमध्ये जैवपोषक पिकांचा वेगाने विस्तार होऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, महिला शेतकऱ्यांचे उत्पादन व धान्य गुणवत्ता सातत्याने सुधारण्यासाठी विस्तार कर्मचाऱ्यांना व सीआरपी (Community Resource Persons) यांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. महिला-केंद्रित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि क्षेत्रीय मार्गदर्शनामुळे जैवपोषक पिकांचे प्रत्यक्ष फायदे अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात.

संशोधन ते शेतकरी हा प्रवास अधिक सक्षम करण्यावर भर देताना त्यांनी सांगितले की, जैवपोषक पिकांना राज्य व केंद्र शासनाच्या मुख्य कृषि योजनांमध्ये स्थान मिळण्यासाठी कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, स्वयंसेवी संस्था व खासगी भागीदार यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी मजबूत संशोधन–विस्तार साखळी उभी करणे काळाची गरज आहे.

जैवपोषक पिकांचा स्वीकार वाढल्यास केवळ उत्पादनात वाढ होणार नाही, तर ग्रामीण भागातील पोषण सुरक्षा बळकट होऊन शाश्वत शेती विकासास चालना मिळेल, असा विश्वासही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात बदलत्या हवामान परिस्थितीवर राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

 परिसंवादात बदलत्या हवामानात शाश्वत पिकांचे संरक्षण व शेती विकासावर भर


बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण व शाश्वत वनस्पती आरोग्य या विषयावर “Integrating Crop Care for Sustainable Plant Health under Changing Climatic Scenario” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद (पश्चिम विभाग) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आला. हा परिसंवाद विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) तसेच अकोला येथील कृषि वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या राष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन पद्धतीने भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB) चे माननीय माजी अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, भाकृअप–भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा, नवी दिल्ली येथील इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) चे अध्यक्ष डॉ. दिनेश सिंग (ऑनलाईन), सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अकोला येथील कृषी वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. बी. टी. राऊत, परिसंवादाचे संयोजक डॉ. विक्रम घोळवे व सहसंयोजक डॉ. गजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाच्या कार्य व प्रगतीचा आढावा घेतला. मराठवाड्यासाठी उपयुक्त जैवतंत्रज्ञानावर आधारित वाण, गोदावरी तुरीचा वाण, विविध पिकांचे सुधारित वाण तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान विकसित करण्यात विद्यापीठाने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘बायोमिक्स’सारखी उत्पादने शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून भविष्यात जैविक कीटकनाशके, रोगनाशके व खते निर्मितीवर भर दिला जाईल. रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना संत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता तसेच नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे अर्थशास्त्र विषयावरील पुस्तक भेट म्हणून प्रदान केले. तसेच त्यांनी स्वतः लिखित कॉटन इम्प्रुव्हमेंट हे पुस्तक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांना भेट दिले.

या प्रसंगी त्यांनी विद्यापीठातील सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत शास्त्रज्ञांना समाजात मोठा सन्मान लाभतो, असे नमूद केले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात पायाभूत सुविधांचा भक्कम विकास व बाह्य निधीची मोठी प्राप्ती झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

संशोधन क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून कृषिशास्त्रात सखोल व प्रभावी कार्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अन्नधान्य निर्यातीमुळे हरितक्रांतीचे यश स्पष्ट होते, तसेच रोगप्रतिकारक वाण विकासात वनस्पती रोगशास्त्राचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शास्त्रज्ञांचे ज्ञान देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक असून हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी व संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात हवामान बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून, या पार्श्वभूमीवर परिसंवादातून मिळणारे ज्ञान शेती विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले. हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकास तील विद्यापीठाच्या योगदान तसेच शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने विद्यापीठास ‘अ’ दर्जाची अधिस्वीकृती दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, सुधारित पीक वाण व तंत्रज्ञान विकास, तसेच बायोमिक्स उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ घडवून आणली आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि ‘महाॲग्री’ ॲपचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती तसेच शेतातील पिकांचे अवशेष शेतातच कुजविणे गरजेचे असून, यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असून, प्रत्येकाने आपल्या विभागाच्या चौकटीपलीकडे विचार करून शेतकरी-केंद्रित पीक पद्धती विकसित कराव्यात. या दृष्टीने हा परिसंवाद निश्चितच लाभदायक ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आयपीएसचे अध्यक्ष डॉ. दिनेश सिंग यांनी संस्थेतील सभासद संख्या आणि उपक्रमांचा आढावा सादर केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे परिसंवाद यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. माननीय माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी शास्त्रज्ञांमध्ये नवचेतना व परस्पर विश्वास निर्माण करण्यातील योगदानाची दखल घेतली, तसेच शेतकरी हितासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी विभागाच्या वारशाची महत्त्वाची माहिती दिली आणि परिसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना व शास्त्रज्ञांना अद्ययावत ज्ञान मिळेल, जे संशोधन व उत्पादन विकासासाठी उपयोगी ठरेल असे सांगितले. परिसंवादाचे संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे यांनी आयोजनाची भूमिका व विभागाच्या मागील वर्षातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.

परिसंवादात इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीच्या वतीने फेलो अवॉर्ड दिला गेला. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील डॉ. विक्रम घोळवे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. सुनीता मगर, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील डॉ. ए. एम. सरपे, डॉ. वाय. बी. इंगळे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. व्ही. एस. शिंदे यांची निवड झाली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी प्राध्यापक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मळ, श्री रमेश देशमुख, डॉ. टी. बी. गरुड, डॉ. के. टी.आपेट, डॉ. ए. पी. सूर्यवंशी, डॉ. आर. व्ही. देशमुख, श्री अंकुश मोरे, श्री एस. के. देशमुख, डॉ. पी. ए. ठोंबरे, डॉ. के. एस. कुलथे, श्री एल. आर. खरवडे, डॉ. बी. पी.दंडनाईक, श्री टी. आर. मोगले, श्री एस. एस. घुगे, श्री व्ही. जी. मुळेकर, डॉ. बी. आर. कावळे, श्री अंकुश दहिवाल, डॉ. आर.बी. सोळंके, डॉ. ओ. डी. कोहिरे, डॉ. के. जी. राऊत, डॉ.व्ही व्ही दातार, डॉ. एम. एच. शेख व डॉ. के. एम. चव्हाणआदिंचा समावेश होता.

परिसंवादात विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभरातून १३० शास्त्रज्ञ व १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पुढील दोन दिवसांत या शास्त्रज्ञांमार्फत आपले संशोधन कार्य सादर करण्यात येणार आहे.

परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने केले, संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे व सह-संयोजक सचिव डॉ. गजेंद्र जगताप यांनी कार्य पाहिले.












वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ‘वेटरन्स इंडिया – प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ प्रदान

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात मोठे यश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासवेटरन्स इंडिया – प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय परीक्षक समितीने विद्यापीठाची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली होती. हा सन्मान सोहळा मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता, नवी दिल्ली येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर, संसद मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माननीय संरक्षण राज्यमंत्री नामदार श्री. संजय सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC), अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE), भारतीय विद्यापीठ संघ (AIU) आदी नामांकित संस्थांचे अध्यक्ष व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मान्यवरांच्या शुभहस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. वेटरन्स इंडिया संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील पारेख यांनी माननीय कुलगुरूंना प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची विनंती केली होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त होऊ शकले आहे. यानिमित्ताने प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठ विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या तत्त्वांवर कार्यरत आहे. हा पुरस्कार विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती आहे. हे यश विद्यापीठातील सर्व शिक्षक, संशोधक, विस्तार अधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ सातत्याने यशाची नवनवी शिखरे गाठत असून, विद्यापीठाच्या कार्यास महाराष्ट्र शासन, पुणे येथील कृषि परिषद तसेच विद्यापीठाची कार्यकारी व विद्वत परिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

या यशात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे,असे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे उल्लेखनीय कार्य -

मागील तीन वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात राबविलेले विविध विशेष उपक्रमप्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ मिळण्यासाठी निर्णायक ठरले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे, वसतिगृहांची दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीतूनमहाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम आणि ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’ (सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) प्रशिक्षण केंद्र यांची स्थापना यांचा समावेश आहे.

तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीच्या पदवी अभ्यासक्रमांची तसेच पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए (BSMA) अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर केलेले सामंजस्य करार, विद्यापीठ विकसित तुरीचा ‘गोदावरी’ वाण, सोयाबीनचे विविध वाण, हरभऱ्याचा ‘परभणी चना’ वाण, तसेच विविध पिकांसाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक, शाश्वत व परिणामकारक तंत्रज्ञाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता वाढवून आपले जीवनमान उंचावले आहे.

शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा उपक्रम, नियमितपणे आयोजित होणारा ऑनलाईन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनातून विकसित नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि त्यांचे प्रभावी विस्तार कार्य यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला लक्षणीय गती मिळाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीतून दिसून येतो.

विद्यापीठाने विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जनसमुदायामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर’ या यशोगाथेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पदयात्रा काढली. तसेच हर घर तिरंगा’ हा उपक्रम प्रत्येकाच्या घरी राबवण्याचे आवाहन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता पदयात्रा (युनिटी मार्च)’ आयोजित करण्यात आली.
यासोबतच हमारा संविधान – माझे संविधान” या संकल्पनेच्या आधारे संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.

या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल निवड समितीने घेऊन विद्यापीठाचा सन्मान केल्याबद्दल तसेच मराठवाड्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने वेटरन्स इंडिया संस्थेचे आभार मानले आहेत.,

या प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मानामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व समाजोपयोगी कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेल्याबद्दल संपूर्ण विद्यापीठ परिवारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

व्हेटरन्स इंडिया बाबत

व्हेटरन्स इंडिया ही केवळ एक संस्था नसून, भारताच्या एकता, प्रगती आणि सशक्तीकरणासाठी समर्पित असलेली एक देशभक्तीची चळवळ आहे. माननीय डॉ. बी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सन २०१५ मध्ये स्थापन झालेली ही राष्ट्रीय, राजकीयदृष्ट्या अलिप्त आणि लोककेंद्रीत चळवळ अल्पावधीतच ३८ लाखांहून अधिक सदस्यांचा भक्कम परिवार बनली असून, देशातील सर्वात मोठ्या देशभक्तीच्या व्यासपीठांपैकी एक ठरली आहे.

राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करणे, युवकांना सशक्त बनवणे, शहीदांना सन्मान देणे आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणे या उद्दिष्टांसह व्हेटरन्स इंडिया आत्मनिर्भर, प्रगत भारताची संकल्पना साकार करण्यासाठी कार्यरत आहे. भारताने पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ म्हणून आपले स्थान प्राप्त करावे, हीच या चळवळीची दूरदृष्टी आहे।

जो कोणी ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणू शकतो, तो व्हेटरन्स इंडियाचा सदस्य होऊ शकतो” ही साधी पण प्रभावी विचारधारा या चळवळीचा पाया आहे. या समावेशक दृष्टिकोनामुळे जात, धर्म, प्रांत आणि सामाजिक स्तर यांच्या भिंती दूर सारल्या गेल्या असून, राष्ट्रनिर्मितीच्या समान ध्येयासाठी लाखो भारतीय एकत्र आले आहेत.

व्हेटरन्स इंडिया – दृष्टी (VISION)

व्हेटरन्स इंडियाची दृष्टी अशी आहे की, प्रत्येक नागरिक राष्ट्रप्रेमाच्या भावनेने एकत्र आलेला असा भारत.
सामाजिक, आर्थिक व प्रादेशिक विषमता मुक्त समाज. नावीन्य, शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा भारत. संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (SDGs) सक्रिय योगदान देणारा देश.

मुख्य उद्दिष्टे:

१.     माजी सैनिक व शहीदांच्या कुटुंबांना पाठबळत्यांच्या त्यागाचा सन्मान करणे व त्यांच्या कल्याणाची काळजी घेणे.

२.     युवक सशक्तीकरणनेतृत्वगुण विकास, शिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.

३.     समावेशक विकासाचा प्रसारग्रामीण व शहरी समुदायांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.