Pages

Sunday, February 1, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ज्वारी संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रास भेट देऊन तेथील चालू संशोधन उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान ज्वारी पिकातील नवीन वाण व संकरीत (हायब्रिड) विकास, उत्पादनक्षमता वाढविणारे संशोधन तसेच ज्वार विविधता पॅनेल (Sorghum Diversity Panel) अंतर्गत सुरू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.

माननीय कुलगुरूंनी ज्वारी पिकाचे बदलत्या हवामानातील महत्त्व अधोरेखित करताना, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे, कीड-रोग प्रतिकारक्षम व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे वाण विकसित करण्यावर भर दिला. तसेच संशोधन हे केवळ प्रयोगशाळा किंवा शेतमर्यादित न राहता, त्याचे निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान पदव्युत्तर (पीजी) व पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकरीकेंद्रित, समस्या-आधारित व व्यवहार्य संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत माननीय कुलगुरूंनी महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले. संशोधन, विस्तार व शेतकरी यांच्यात सुसूत्रता निर्माण होणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी श्रीमती जयश्री मिश्रा, ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी व ज्वार पैदासकार डॉ. अंबिका मोरे, कृषि सहायक श्री इंगळे तसेच संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली.

माननीय कुलगुरूंच्या या प्रेरणादायी व मार्गदर्शक भेटीमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ज्वारी संशोधन केंद्राच्या वतीने त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.