Pages

Friday, February 20, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी शिवजन्मोत्सव २०२६ साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या भव्य पालखी मिरवणुकीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्वागत केले





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२६ निमित्त शिवजन्मोत्सव २०२६ विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १३ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये, ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यापीठ ग्रंथालयाजवळ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उपाध्यक्ष जिमखाना डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले महाविद्यालयाचे लेझिम पथक यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत केले. त्यानंतर माननीय कुलगुरू यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक संपन्न झाली. पुढे महाविद्यालयाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आकर्षक कवायतींसह लेझिम प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या शिवगर्जनेसह झालेल्या आगमनामुळे तसेच महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण रोमांचकारी व प्रेरणादायी झाले.

कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या महाराष्ट्राशी आणि शिवरायांच्या विचारांशी असलेली नाळ अधोरेखित केली. याबाबत माननीय कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

कृषि महाविद्यालयाच्या शिवजन्मोत्सवाची सुरुवात १३ फेब्रुवारी रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने झाली. याच दिवशी दुपारी शिवशाहीर राजन सरवदे यांचा पोवाडा सादर करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा, १५ फेब्रुवारी रोजी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रश्नमंजुषा व दुपारी बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. १७ फेब्रुवारी रोजी प्रा. डॉ. प्रशांत कोठे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले, तर १८ फेब्रुवारी रोजी व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांनी शिवचरित्रावर मार्गदर्शन केले.

उत्सवाचा मुख्य दिवस १९ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम पार पडला, तर सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

या शिवजन्मोत्सवाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. स्वाती झाडे, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. धीरज पाथ्रीकर, श्री. विजय गारकर, ०२२ बॅच व समस्त दगडी परिवार यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव २०२६ समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे, उपाध्यक्ष योगेश पुरी, कोषाध्यक्ष रणजित वडकुते व सचिव मोहन फुलवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला असून, संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.