Pages

Friday, February 13, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रम; शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या निर्देशानुसार करण्यात येते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवून, विद्यापीठापासून दूर असलेल्या भागांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहोचविण्याच्या उद्देशाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ९ चमूंमधील २५ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील कार्यक्रमास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ केवळ कृषि तंत्रज्ञान पुरविण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्यही घेतले जाईल. विद्यापीठ शेतकरी देवो भवः’ या तत्त्वावर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद करून, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विविध योजना व सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राकेश अहिरे यांनी सोयाबीन, तूर, कापूस व हळद या मराठवाड्यातील प्रमुख पिकांच्या अधिक उत्पादनासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी कापसाची घनपद्धतीने लागवड, सुधारित वाणांचा वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाचा महिला मेळावा (३ जानेवारी), खरीप (१८ मे) व रब्बी (१७ सप्टेंबर) या शेतकरी मेळाव्यांची माहिती देत, बियाणे व निविष्ठा विक्री, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच व्हॉट्सअॅप हेल्पलाईन, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल, ब्लॉग व ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे विद्यापीठ शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन तसेच लागवड पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळदीतील कंदमाशी व्यवस्थापन, कापूस लागवड तंत्रज्ञान व कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयी माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, बदनापूर, खामगाव) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, प्रा. किशोर जगताप, डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन धांडगे, श्री. मधुकर मांडगे, तसेच कृषि विभागाचे अधिकारी श्री. आनंद नंदनवरे, श्री. सचिन उबाळे व श्री. उदय देवळणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे ऑनलाइन मार्गदर्शन   

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे मौजे पुसेगाव (ता. सेनगावजि. हिंगोली) येथे मार्गदर्शन करताना 
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना  
सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, मौजे काटे पिंपळगाव तालुका गंगापूर येथे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना 


उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत प्र सुर्यवंशी मौजे औसा, जि लातूर येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना 


 कृषि विज्ञान केंद्र, खामगावचे शास्त्रज्ञ डॉ. बी. बी. गायकवाड आणि प्रा. के. एल. जगताप मौजे राक्षसभुवन ता. गेवराई येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना