Pages

Thursday, February 19, 2026

वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

 शिवकाळ आणि आजचा भारत” विषयावर प्रा. अरविंद सगर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रा. अरविंद सगर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. धैर्य, संघटन कौशल्य व स्वराज्याची संकल्पना आजच्या युवकांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शनपर भाषणात प्रा. अरविंद सगर यांनी शिवकाळ आणि आजचा भारत” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास विसरता कामा नये, असे सांगत युवकांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थिनी कु. मोदीता इंगळे, कु. आरती शिंदे तसेच विद्यार्थी यशराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा उल्लेख करत देशप्रेम, शिस्त व संघभावना या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. सुमंत जाधव यांनी करून दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, शिवजन्म पाळणा उत्सव, छावा संगमेश्वर आदी ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले. ढोल व लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढली.

व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. विवेकानंद भोसले, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. सुमंत जाधव व डॉ. प्रमोदिनी मोरे उपस्थित होते. तसेच डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. शैलजा देशवेना यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थी सतेज मेटकर, अथर्व घुगे, राम शेडगे, संकेत पवार, समर्थ असूटकर, अभिषेक गवळी तसेच जिमखाना विभागातील श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड, श्री. शंकर शामार्थी व श्री. हनुमंत ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किंजल मोरे व कु. शिवानी डोईजड यांनी केले, तर आभार प्रदर्शन राधेश्याम खंटीग यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक शोभिवंत व संस्मरणीय ठरला.