Pages

Wednesday, April 15, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांची भेट

 विकास कामांबाबत सकारात्मक व फलदायी चर्चा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांच्यामध्ये कृषि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सखोल व सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुलींच्या वसतिगृहाचा वरचा मजला बांधकाम, सुसज्ज रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक जिम, प्रशस्त सभागृह तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी संरक्षण भिंत उभारणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व कामांसाठी आवश्यक प्रस्तावांची तातडीने पूर्तता करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिले. त्यास प्रतिसाद देत माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, उप-अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. खंदारे, सीताफळ संशोधन केंद्राचे डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुदानातून तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, सुविधा व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.