Pages

Wednesday, April 8, 2026

वनामकृवित “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तारक, विद्यार्थी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय परस्परसंवादी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण, भारत सरकारचे अध्यक्ष मा. डॉ. त्रिलोचन मोहापात्रा उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यशाळेमध्ये हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी स्थानिक वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेचे आयोजक सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, उपसंचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर आणि कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (लातूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांच्या वतीने या कार्यशाळेस शेतकरी, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.