Pages

Sunday, May 3, 2026

वनामकृविद्वारा खरीप २०२६ आकस्मिक नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली “खरीप २०२६ आकस्मिक नियोजन” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन बैठक दिनांक ०२ मे २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविलेल्या खरीप हंगामातील पावसाचा अंदाज (९२% ± ५%) तसेच ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामाचे प्रभावी नियोजन करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘एल निनो’च्या संभाव्य परिस्थितीतून उद्भवणाऱ्या जैविक व अजैविक ताण (biotic abiotic stress) व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली व हवामान अंदाजाच्या आधारे त्यावर सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून भारतीय मौसम विभाग, नवी दिल्ली येथील ॲग्रोमेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ. शेषकुमार गोरोशी उपस्थित होते. त्यांनी “हवामान आधारित कृषी नियोजन” या विषयावर सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः नमूद केले की, परभणी येथील ॲग्रोमेट फील्ड युनिट (AMFU) हे उपग्रह आधारित तंत्रज्ञान व रिअल-टाईम माहितीचा प्रभावी वापर करून देशातील उत्कृष्ट केंद्रांपैकी एक म्हणून कार्य करत आहे.

बैठकीत जिल्हा कृषी आकस्मिक योजना (DACP) अद्ययावत करणे, ‘एल निनो’ व खरीप नियोजन,  भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तसेच बियाणे, खते व पाणी साठवणूक यांचा आढावा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर बैठकीचे नियोजन विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प (AICRP on Agrometeorology) प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.