Pages

Thursday, June 25, 2026

वनामकृविद्वारा खेत बचाव अभियानांतर्गत सायाळ-खटिंग येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

 रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात देशभर खेत बचाव अभियान” राबविण्यात येत आहे. स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा प्रमुख उद्देश मातीचे आरोग्य संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, पर्यावरण संरक्षण तसेच शाश्वत शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील सायाळ-खटिंग येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम २०२६ तसेच अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आभासी माध्यमातून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचे संतुलन आणि पिकांची उगवणक्षमता यावर प्रतिकूल परिणाम होत असून दीर्घकालीन शेती उत्पादनक्षमतेलाही धोका निर्माण होत आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून शेणखत, गांडूळखत, जैविक खते तसेच इतर सेंद्रिय घटकांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. “स्वस्थ माती, सक्षम शेतकरी आणि समृद्ध भारतया संकल्पनेला बळ देण्यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, पीक फेरपालट, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय कर्ब वाढविणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादन खर्च कमी ठेवून शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक व प्राकृतिक शेती पद्धतींचा स्वीकार, स्थानिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान अंगीकारण्याचा सल्ला देत, भविष्यातील शेती ही मातीच्या आरोग्यावर आधारित असली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी एल-निनो परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन, विहीर पुनर्भरण आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीनची पेरणी करावी, असे मार्गदर्शन केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि जैविक अन्नद्रव्यांच्या वापरावर भर दिला.

विशेष उपस्थिती असलेले विद्यापीठ रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी रावे अंतर्गत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या ऑनलाइन मार्गदर्शन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. विलास खरगखराटे यांनी एल-निनो परिस्थितीत पर्यायी पिकांची माहिती दिली. डॉ. ए. एस. यू. उमाटे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, डॉ. बी. एन. वाड यांनी पशुधनाची काळजी व लसीकरण, डॉ. स्वाती झाडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगत दर दोन वर्षांनी माती परीक्षण करण्याचा सल्ला दिला. डॉ. विक्रम घोळवे यांनी रोग नियंत्रण व बायोमिक्स, डॉ. आर. एस. जाधव यांनी कीड व्यवस्थापन तर डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास गावच्या सरपंच श्रीमती पद्मिनीबाई खटिंग, उपसरपंच श्री. भगवानराव खटिंग तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिकूच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. मिर्झा आय. ए. बी. आणि डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूत सार्थक धुमाळ, संदीप ढवळे, शिवानी बुरांडे, आदिती बल्लाळ, स्नेह बासेवाड, गायत्री बिरादार, कीर्ती बेले तसेच इतर कृषीदूतांनी विशेष परिश्रम घेतले.