Pages

Wednesday, June 24, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची जालनाच्या माननीय जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल (आयएएस) यांच्याशी सदिच्छा भेट; कृषी तंत्र विद्यालय जालना विकासाबाबत सकारात्मक चर्चा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय श्रीमती अशीमा मित्तल (आयएएस) यांची बुधवार, दिनांक २४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जालना येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीत कृषी तंत्र विद्यालय, जालना येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र (Training and Skill Infrastructure Centre) सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील युवक-युवतींना कृषीपूरक उद्योग, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उद्योजकता विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात करण्यावर भर देण्यात आला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात कृषी शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे सांगितले. या उपक्रमांमुळे ग्रामीण युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कृषी तंत्र विद्यालय परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, कौशल्याधारित प्रशिक्षणासाठी स्वतंत्र केंद्र विकसित करणे तसेच संस्थेच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. तसेच कृषी तंत्र विद्यालय परिसरातील अतिक्रमण हटवून संस्थेच्या जागेचे संरक्षण व विकासकामांना गती देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

भेटीदरम्यान शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र अभ्यास डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. हरिहर कौसडीकर, कृषि विज्ञान केंद्र (बदनापूर) चे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी तसेच कृषी तंत्र विद्यालय, जालना चे प्राचार्य डॉ. श्रीकांत सरोदे उपस्थित होते.