Pages

Tuesday, June 16, 2026

वनामकृवित रेशीम उद्योग- तुती लागवड पूर्व कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत रेशीम संशोधन योजना, परभणी येथे जिल्हा रेशीम कार्यालय, परभणी  आणि रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक  दिवसीय रेशीम उद्योग- तुती लागवड पूर्व कार्यशाळा दिनांक १६ जून २०२६ रोजी संपन्न झाली.  या कार्यशाळेस परभणी जिल्यातील ४०  शेतकरी उपस्थित होते.  या कार्यशाळेत तुती रोपवाटिका, तुती लागवड व रेशीम उद्योगाबाबत मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उद्घाटक केंद्रीय रेशीम बोर्ड- अनुसंधान विस्तार केंद्र, परभणीचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना तुती लागवड तंत्रज्ञान विषयी संबोधित करताना तुती लागवडीच्या विविध पद्धती, खत व पाणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. शंकर वराट यांनी रेशीम उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करत तुती लागवड दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा संतुलित वापर करून सेंद्रिय खते, शेणखत आणि कंपोस्टचा नियमित वापर करावा असे आवाहन केले. त्याच बरोबर रेशीम उद्योगासाठीच्या विविध शासकीय योजना व अनुदान याबाबत मार्गदर्शन केले.

रेशीम संशोधन योजनेचे सहाय्यक प्राध्यापक श्री. धनंजय मोहोड यांनी रेशीम उद्योगापुढील आव्हाने जसे रेशीम अळी कोष न विणने, रेशीम अळी वरील रोग  व त्यावरील उपाययोजना या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. संजोग बोकन यांनी  रेशीम किटकांवरील उझी माशीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर माहिती दिली.

कार्यशाळेमध्ये तुती लागवड, गांडूळखत निर्मितीचे  प्रात्यक्षिक  दाखविण्यात आले. सूत्रसंचालन श्री. सागर मिसाळ, क्षेत्र सहाय्यक, जिल्हा रेशीम कार्यालय, परभणी यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पी. यु. भंडारे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अंबादास भालेराव, श्री. मुंडे, श्री. वागतकर, श्रीमती शुभांगी गोरे, श्री. व्यास यांनी परिश्रम घेतले.