Pages

Monday, June 29, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात राज्यस्तरीय पीजी-सीईटी-२०२६ प्रवेश परीक्षा यशस्वी संपन्न

 


महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय सामायिक पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (PG-CET-2026) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे दिनांक २७, २८ आणि २९ जून २०२६  या कालावधीत अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

तीन दिवस चाललेल्या या परीक्षेमध्ये कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, वनस्पतीशास्त्र, मत्स्यशास्त्र, सामुदायिक विज्ञान तसेच आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान अशा विविध शाखांतील पदव्युत्तर प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी सुमारे १२४२ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

या परीक्षेच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी परीक्षा केंद्रास दिनांक २९ जून २०२६ रोजी भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी परीक्षा केंद्रावरील सर्व व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा तसेच पारदर्शक आणि शिस्तबद्ध परीक्षा प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी परीक्षा कार्यात सहभागी अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, उप कुलसचिव डॉ गजानन भालेराव यांनीही परीक्षा केंद्रास नियमित आणि वेगवेगळ्या कालावधीत भेटी देवून पाहणी केली व परीक्षेवर नियंत्रण ठेवले.

परीक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ पर्यवेक्षकच्या निगराणी आणि नियंत्रणात परीक्षा पार पडली. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. दिलीप झटे तसेच प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. संपूर्ण परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

ही परीक्षा राज्यातील कृषि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, परभणी केंद्रावरील उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.