Pages

Sunday, July 12, 2026

वनामकृविच्या कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRP on Dryland Agriculture) येथे सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध पिकांवरील संशोधन, हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान, मृदा व जलसंधारण उपाययोजना तसेच पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत  *सविस्तर मार्गदर्शन केले.*

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींसोबत हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विशेषतः खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील घट टाळता येते.

त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीच्या भेगा बुजविण्याचा सल्ला दिला. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा बारीक थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन (Mulching) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते, असे त्यांनी सांगितले.

ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) ची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषण सुरळीत राहते आणि उत्पादन क्षमता टिकून राहण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा इतर जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचन द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारण सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर त्यांनी भर दिला.

पुढे त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक आहे. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी व सूर्यफूल ही पिके घेता येऊ शकतात. त्यानंतर पावसास विलंब झाल्यासव दुष्काळसहिष्णू पिके, जसे तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ व तीळ यांना प्राधान्य द्यावे.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी माननीय कुलगुरूंनी संशोधन, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे तसेच प्रकल्पावरील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गोरे यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची, हवामान बदलाशी संबंधित संशोधनाची आणि पावसाच्या खंड काळात पिकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली.