Pages

Wednesday, July 22, 2026

वनामकृविद्वारा "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" विषयावरील ऑनलाइन मार्गदर्शन संपन्न

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि हवामान-अनुकूल शेतीवर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" या विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, सध्याच्या अनिश्चित पावसाच्या परिस्थितीत विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांनी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतभेटी घ्याव्यात. प्रत्यक्ष पीक परिस्थिती, मृदेतील ओलावा आणि हवामान अंदाजाचा सखोल अभ्यास करून पीकनिहाय व परिस्थितीनुसार शास्त्रीय मार्गदर्शन करावे. उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संरक्षी सिंचन, सूक्ष्म सिंचन पद्धती आणि पाण्याचा प्रत्येक थेंब पिकासाठी उपयुक्त ठरेल अशा उपाययोजनांवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यासोबतच कमी खर्चातील, स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पीक अवशेषांचे आच्छादन, अंतरमशागत, मृदा ओलावा संवर्धन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच कोरडवाहू शेतीतील हवामान-अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य सल्ला देऊन उत्पादनातील जोखीम कमी करणे, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठाची संशोधन व विस्तार यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्य करावी, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या भागात सध्या पावसाचा खंड आहे, तेथे पिकांमध्ये हलकी कोळपणी व अंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा, तणांचे प्रभावी व्यवस्थापन करावे, १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून पिकावरील ताण कमी करावा, पिकांमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षी सिंचन द्यावे.

तसेच ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, त्या ठिकाणी तूर, बाजरी, सूर्यफूल आणि एरंडी यांसारख्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, तूर + बाजरी, तूर + एरंडी तसेच एरंडी + धने या आंतरपीक पद्धतींचा अवलंब केल्यास बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादनाचा धोका कमी होऊन शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाभुळगाव (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार,  कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. वसंत सूर्यवंशी तसेच कृषि विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव ऑनलाइन सहभागी झाले होते.

यावेळी सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन, पावसाच्या खंडाचा पिकांवरील परिणाम, सुरुवातीच्या व मध्य अवस्थेतील पिकांचे व्यवस्थापन, कमी पावसातील ताण व्यवस्थापन, मृदा ओलावा संवर्धन तंत्रज्ञान, जलसंधारण उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.