Pages

Wednesday, July 1, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत आहारतज्ज्ञ पदावर निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थिनींचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या पदवीप्राप्त विद्यार्थिनी कीर्ती यशवंत घुमरे, मृणाली शिवदास तोंडारे, गायत्री बालमुकुंद काबरा आणि स्वाती केशवराव शिंदे यांची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र शासन अंतर्गत आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. तर योगेश्वरी सतिशराव पवार आणि जान्हवी रंगराव उक्कलगावकर या दोन विद्यार्थीनी प्रतीक्षा यादी मध्ये आहेत

या पदासाठी कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी.एस्सी. गृह विज्ञान (B.Sc. Home Science), बी.एस्सी. (ऑनर्स) गृह विज्ञान [B.Sc. (Hons.) Home Science] तसेच बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान [B.Sc. (Hons.) Community Science] या अभ्यासक्रमांच्या पदव्या शैक्षणिक पात्रता म्हणून ग्राह्य धरण्यात आल्या.

मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी स्पर्धा परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारण्यात आले असून परीक्षा एकूण २०० गुणांची होती. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी (Merit) व त्यानंतरच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या आधारे करण्यात आली.

या विद्यार्थिनींच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणातून मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या नव्या संधींबाबत उत्साह वाढला आहे.

या यशामागे विद्यापीठ प्रशासनाचे विशेष योगदान राहिले आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक तांत्रिक बाबींचे निराकरण केले होते.

विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, यांच्यासह सर्व माजी अधिष्ठाता, माजी विभागप्रमुख, माजी प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी यशस्वी विद्यार्थिनींनी भावना व्यक्त करत सांगितले की, तांत्रिक बाबींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयाने दिलेले अनमोल सहकार्य, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि खंबीर पाठिंबा याशिवाय हे यश संपादन करणे कठीण झाले असते.

ही निवड सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीची आणि विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनाची साक्ष देणारी ठरली आहे.