Pages

Friday, July 31, 2026

वनामकृवित एनसीसी छात्रसैनिकांना व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्वाचे धडे

 एनसीसी कॅडेट्स सर्व क्षेत्रात निपुण : ब्रिगेडियर अनुप बरबरे

विद्यार्थी जीवनात शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित होत असल्याने एनसीसी कॅडेट्स सर्वच क्षेत्रात निपुण ठरतात, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे दिनांक ३० जुलै २०२६ रोजी एनसीसीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमास ब्रिगेडियर अनुप बरबरे, कर्नल दिलीप रेड्डी तसेच ‘अब नॉर्मल होम’च्या संचालिका किशोरी पाठक यांनी भेट दिली. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे होते. यावेळी सुभेदार मेजर मोहन सिंग, लेफ्टनंट प्रशांत सराफ (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), सेकंड ऑफिसर बालाजी सूर्यवंशी (एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, परभणी) तसेच ओंकार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमारे ३०० एनसीसी छात्रसैनिक उपस्थित होते. छात्रसैनिकांनी सशस्त्र मानवंदना देऊन मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पुढे मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी विद्यार्थी जीवनातील शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. "शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोणतेही यश संपादन करता येते," असे ते म्हणाले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारीची जाणीव आणि देशसेवेची प्रेरणा विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर किशोरी पाठक यांनी छात्रसैनिकांना दैनंदिन जीवनात योग्य निर्णय कसे घ्यावेत, व्यासपीठावर प्रभावी व लोकाभिमुख संवाद कसा साधावा तसेच सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी, याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक सत्राला छात्रसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेकंड ऑफिसर सोपान सावळे (नवोदय विद्यालय, परभणी) यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, कृषि महाविद्यालय, परभणी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून छात्रसैनिकांना शिस्त, नेतृत्व, निर्णयक्षमता, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे छात्रसैनिकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना अधिक दृढ झाली.