पर्यावरण संवर्धनासोबत पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सामाजिक
वनीकरण विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘औषधी वनस्पती व सुगंधी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा’ शुभारंभ आज दिनांक ११ ऑगस्ट
२०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली
व शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम विद्यापीठातील सायाळा ब्लॉक,
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रालगत आयोजित करण्यात आला.
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना पारंपरिक
पिकांसोबत पर्यायी व अधिक उत्पन्नक्षम पिकांचा पर्याय उपलब्ध करून देणे तसेच पर्यावरण
संवर्धन व हरित क्षेत्रवाढीस चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख
उद्देश आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींना वाढती मागणी असल्याने त्यांच्या शास्त्रीय व
व्यावसायिक लागवडीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्यास मदत होणार
आहे.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित
केले. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतून नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासोबतच
पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालकडॉ. बाबासाहेब
ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कृषी विद्या विभाग प्रमुख तथा मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रभारी अधिकारी डॉ. विलास
खर्गखराटे तसेच सहयोगी संचालक (बियाणे) व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत
काळपांडे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती एस. एस. पठाण तसेच
सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भूषण जगन्नाथराव गजपुरे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
या उपक्रमांतर्गत एकूण १० हेक्टर क्षेत्रापैकी ७.५०
हेक्टर क्षेत्रावर तब्बल २ लाख २५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये औषधी
वनस्पती, जंगली वनस्पती, फळझाडे, फुलझाडे
तसेच इतर विविध रोपांचा समावेश आहे.
औषधी वनस्पतींमध्ये मोह, बेहडा, अर्जुन, कडुनिंब, हिरडा,
शमी, रक्तचंदन, आवळा,
बेल, कढीपत्ता आणि मेहंदी यांचा समावेश आहे. फळझाडांमध्ये
चिंच, आंबा, जांभूळ, फणस, सीताफळ, चारोळी, डाळिंब, लिंबू आणि करवंद या रोपांची लागवड करण्यात येणार
आहे. जंगली वनस्पतींमध्ये वड, उंबर, साग,
बीजा, शिरस आणि सीताअशोक यांचा समावेश आहे. फुलझाडांच्या
रोपांमध्ये तामण, पारिजातक, स्वस्तिक,
कणेरी, चमेली, मोगरा,
जास्वंद, गुलाब, रातराणी,
मधुमालती, मोती मोगरा आणि बोगनवेल यांचा समावेश
आहे. तसेच इतर रोपांमध्ये आलामुंडा, कुंदा, मिलिस्टोमा, अनंता, सदाफुली,
रातराणी, शेवगा आणि हादगा यांचा समावेश करण्यात
आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून औषधी व सुगंधी वनस्पतींच्या
शाश्वत लागवडीबाबत जनजागृती करण्यासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन
देण्यात येणार आहे. या पिकांच्या लागवड, व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाबाबत शेतकऱ्यांना
मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या तसेच उत्पन्नवाढीच्या नव्या संधी निर्माण
होऊ शकतात.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील आणि सामाजिक
वनीकरण विभागाचे अधिकारी शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात परभणी
येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला.
.jpeg)

.jpeg)

