Pages

Thursday, August 27, 2026

कृषिच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर; कृषि अभियंत्यांचे ३८ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू, दोन दिवस विविध तांत्रिक सत्रे

कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून शाश्वत व अचूक शेतीला चालना देणे काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजितद इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ यास गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झाली.शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना असून, देशभरातून सुमारे ५०० शेतकरी आणि १०० संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी यांच्या वतीने दिनांक २७ व २८ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्राचे अध्यक्ष अभियंता विजय कांबळे, आयईआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी, कृषि अभियांत्रिकी विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) नेमीचंद्रप्पा एम., एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा आणि अधिवेशनाचे निमंत्रक प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अधिवेशनात शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले. ते म्हणाले की, अभियांत्रिकी हे भविष्यातील कृषि विकासाचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे क्षेत्र असून, कृषि अभियांत्रिकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. २१व्या शतकातील अभियंत्यांना कृषि क्षेत्रासोबतच जैवशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शेतकरी आणि विद्यार्थी हे कृषि क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करून माननीय कुलगुरूंनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातशेतकरी देवो भव’ या भावनेतून शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याला, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. युवक हे राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख आधार असल्याने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे.

भविष्यातील शेतीसाठी अचूक व शाश्वत शेती (Precision and Sustainable Agriculture) यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. अचूक शेतीमुळे नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य करता येते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास न करता ती पुढील पिढीकडे अधिक सक्षम स्वरूपात सुपूर्द करणे हीच विकासाची खरी कसोटी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी यांच्यापृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागवू शकते; मात्र प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही’ या विचाराचा संदर्भ देत विकासाच्या प्रक्रियेत मानवी गरजा आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांच्यात समतोल राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारताने कृषि क्षेत्रात मोठी प्रगती साधली असून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेपासून विविध कृषि उत्पादनांच्या निर्यातीपर्यंत देशाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, भविष्यात भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत.

शेतकऱ्यांना केवळ तंत्रज्ञान नको, तर त्यांच्या समस्यांचे समाधान देणारे तंत्रज्ञान हवे, असे स्पष्ट करून तंत्रज्ञान विकास हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडला गेला पाहिजे, असे कुलगुरूंनी सांगितले. प्रभावी आंतरपीक पद्धती, अचूक शेती, हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान तसेच जोखीम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हवामान बदलामुळे निर्माण होणारी अनिश्चितता ही शेतीतील ‘न्यू नॉर्मल’ ठरत आहे. त्यामुळे कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून हवामान-सक्षम, संसाधन कार्यक्षम आणि शाश्वत शेती विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार तसेच आयईआय यंग इंजिनिअर्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेश तुळशीराम ठोकळ यांचे स्मृती व्याख्यान झाले. शुक्रवारी विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि विशेष तांत्रिक कार्यक्रम होणार असून, समारोप सत्रात अधिवेशनातून पुढे आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी अंतिम करण्यात येणार आहेत.

१०० संशोधनपर लेखांचे पाच तांत्रिक सत्रांत सादरीकरण

परिसंवादासाठी देशभरातून सुमारे १०० संशोधनपर लेख प्राप्त झाले असून, त्यांचे पाच तांत्रिक सत्रांमध्ये प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, अचूक शेती, स्मार्ट सिंचन, कृषि यांत्रिकीकरण, मृदा व जलसंधारण, हवामान बदल, जैवकोळसा, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत कृषि विकास या विषयांवर तज्ज्ञांकडून मंथन होणार आहे.

वनामकृविच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रीय परिसंवादास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके तसेच फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागी झाले. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी मानवी झा आणि पद्मश्री उगिना यांनीही सहभाग नोंदवून त्यांच्या संशोधनाचे सारांश सादर केले.

कुलगुरूंच्या विशेष व्याख्यानानंतर कृषि अभियांत्रिकीतील भविष्यातील उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष चर्चा झाली. अधिवेशनातून हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्य आणि वाढता उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांवर व्यावहारिक व तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांना दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.