Pages

Thursday, August 6, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारीणी सदस्यांची बैठक

माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांची प्रमुख उपस्थिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माजी विद्यार्थी हे विद्यापीठाचे खरे दूत असून, त्यांच्या अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा लाभ विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला मिळणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उद्योजकता, नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे संघटन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, संशोधन सहकार्य तसेच समाजाभिमुख उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त व स्मार्ट (SMART) प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.), प्रा. रामभाऊ घाटगे, माजी कार्यकारी परिषद सदस्य श्री. अनंतराव चोंदे, कृषि उद्योजक श्री. महेश पी. देशमुख, माजी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील कार्यरत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी विविध विधायक सूचना मांडल्या. भविष्यात माजी विद्यार्थ्यांचे व्यापक आणि प्रभावी जाळे उभारून विद्यार्थी, संशोधक आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.