Pages

Saturday, September 12, 2026

५४ व्या संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत वनामकृविच्या ४२ पैकी ४१ तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता; पाचही वाण व चारही कृषी अवजारांच्या शिफारशी मंजूर

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शेतकरीकेंद्रित संशोधनाला मिळाले यश


राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६ आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या संशोधन तंत्रज्ञानांचा आढावा घेण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरत गोगावले होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनीही समारंभात मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव डॉ. परिमल सिंह (भाप्रसे) आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ), डॉ. संजय भावे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), डॉ. शरद गडाख (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) आणि डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ) यांच्यासह महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य श्री. विनायक काशिद, कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन विभागाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५–२६ या कालावधीत शेतकरी देवो भव’ या भावनेतून शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रांत संशोधनाला चालना दिली. विविध पिके, हवामान बदल, मृदा आरोग्य, पीक संरक्षण, डिजिटल शेती, जैविक निविष्ठा आणि मूल्यवर्धन आदी विषयांवर संशोधन करण्यात आले.

या संशोधन कार्याचा अहवाल विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत सादर केला. यासोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन विभागाने विविध पिकांचे वाण, पीक उत्पादन तंत्रज्ञान, कृषि अवजारे तसेच कृषि क्षेत्राशी संबंधित अन्य विषयांवरील एकूण ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या.

या ४२ शिफारशींसह वाण प्रसारणासंदर्भातील सोयाबीनची एक, आंब्याची एक आणि भाजीपाला पिकांच्या तीन अशा एकूण पाच वाणांच्या शिफारशींचा समावेश होता. तसेच कृषि अवजारांशी संबंधित चार शिफारशी सादर करण्यात आल्या.

संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत सादर करण्यात आलेल्या ४२ तंत्रज्ञान शिफारशींपैकी ४१ शिफारशींना मान्यता मिळाली असून, सर्व पाच वाणांच्या तसेच चारही कृषि अवजारांच्या शिफारशींनाही मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शेतकरीकेंद्रित संशोधन कार्याला महत्त्वपूर्ण अधिमान्यता मिळाली आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विषयांवर विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञान शिफारशी आधुनिक, उपयुक्त आणि शाश्वत कृषि पद्धतींच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.

कृषि संशोधन अधिकाधिक शेतकरीकेंद्रित, हवामान-अनुकूल, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने या मान्यतांना विशेष महत्त्व आहे. या तंत्रज्ञान शिफारशींच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि शेतीच्या शाश्वततेत सकारात्मक बदल घडवून आणण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी व्यक्त केला.

या बैठकीमध्ये विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, विविध संशोधन प्रकल्पांचे समन्वयक तथा मुख्य शास्त्रज्ञ यांनी सहभाग घेवून सबंधित विषयांचे सादरीकरण केले. वनामकृविच्या शास्त्रज्ञांच्या बैठकीतील सहभागासाठी संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. सुनिता पवार, डॉ. प्रभाकर पडघन, संशोधन संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वाण प्रसारण

१. सोयाबीन : एमएयूएस ७९१

सोयाबीन पिकाचा वाण एमएयूएस ७९१ हा स्थानिक व राष्ट्रीय तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस आढळून आला आहे. हा वाण विविध कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आढळून आला असून, एमएयूएस ७९१ या वाणाची महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



२. आंबा – राजकेशर (FRSMC-1)

नियमित फलधारणा, लवकर फुलोरा व फलधारणा, कमी पीक कालावधी, आकर्षक रंग, अधिक फळे व उत्पादन, चवीला गोड आणि अधिक टिकवण क्षमता असणारा आंब्याचा “FRSMC-1” हा वाण राजकेशर” या नावाने मराठवाडा विभागात लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



३. खरबूज, परभणी खरबूज (VNMKVMH-1)

परभणी खरबूज (VNMKVMH-1) हा अर्धवट जाळीदार, कुरकुरीत व फिकट नारंगी जाडगर आणि एकसारखी लंबवर्तुळाकार फळे असणारा, अधिक उत्पादन देणारा व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



४. परभणी दुधी भोपळा

परभणी दुधी भोपळा (LTRBG-3x4) हा मध्यम वाढीचा, कडू नसलेली, लांब, सरळ आणि एकसारखी दंडगोलाकार फळे असणारा, अधिक उत्पादन देणारा व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



५. परभणी कारली

परभणी कारली (VNMKVBGH-01) फळे ही गडद हिरव्या चमकदार रंगाची असून ती मध्यम आकाराची व दोन्ही टोकांना निमुळती आणि त्यांच्यावरील शिरा हे तुटक पण आकर्षक फळे असणारा, अधिक उत्पादन व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

 


कृषी औजारे व यंत्र प्रसारण

१. पशुधन धुणे यंत्र

वनामकृवि विकसित पशुधन धुणे यंत्राच्या वापरामुळे पशुधन धुतल्यामुळे त्यांची स्वच्छता, उत्पादन व कार्यक्षमता वाढते. शेण आणि घाण ८९% कमी होते, बाह्यपरजीवींचे निर्मूलन ९५% होते, पाणी आणि मनुष्यबळाची बचत ५०% होते आणि या सर्व गोष्टींचा एकूण परिणाम पशुधनावर सरासरी ४५% या यंत्राच्या सहाय्याने बैलांस उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा, गायींसाठी उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा, तसेच म्हशींसाठी उन्हाळ्यात दररोज दोनदा, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात दररोज धुण्याची शिफारस गोशाळाचालक व पशुपालक शेतकऱ्यांना करण्यात येते.



२. बैलचलित बहुपीक टोकण व स्लरी टाकणे यंत्र

वनामकृवि विकसित बैलचलित बहुपीक टोकण व स्लरी टाकणे (सोबत रेखाचित्र) यंत्राचा वापर हरभरा व रब्बी ज्वारीवर एकाचवेळी पेरणी आणि स्लरी टाकण्यासाठी वापरल्यामुळे बियाण्यामध्ये ५० टक्के, मनुष्यबळात व एकूण मशागतीवर ४६ टक्के बचत झाल्याचे आढळून आले. म्हणून सेंद्रिय शेती करणाऱ्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वापरण्याची शिफारस करण्यात येते.



३. पशुधनास खरारा करणे यंत्र

वनामकृवि विकसित पशुधनास खरारा करणे यंत्राच्या वापरामुळे मोठ्या पशुधनाची स्वच्छता आणि आराम सुधारून त्यांचे उत्पादन व कार्यक्षमता वाढते. शेण आणि डाग ९१%, बाह्यपरजीवी ८८%, आजारी पडण्याचे प्रमाण ८२% कमी होते. या सर्व गोष्टींचा एकूण चांगला परिणाम पशुधनावर सरासरी ३६% आढळतो. या यंत्राच्या सहाय्याने बैलांस उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात दररोज, तसेच गायींसाठी उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा, आणि म्हशींसाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा आणि हिवाळ्यात एक दिवसाआड खरारा करण्याची शिफारस गोशाळा व पशुपालक शेतकऱ्यांसाठी करण्यात येते.



४. अर्ध-स्वयंचलित चारा व खुराक वहनयंत्रणा

वनामकृवि विकसित अर्ध-स्वयंचलित चारा व खुराक वहनयंत्रणा जनावरांना वाळलेला, हिरवा चारा व खुराक देण्यामध्ये मनुष्यबळात ५० टक्के, वेळेत ९३ टक्के आणि चारा नासाडीमध्ये ४४ टक्के पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत बचत होत असल्यामुळे सहा जनावरांपर्यंतच्या लहान दुग्धव्यवसायिक आणि पशुपालकांसाठी शिफारस करण्यात येते.