Pages

▼

Saturday, September 26, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची कावेरी विद्यापीठास भेट; लवकरच सामंजस्य करार होणार

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आज दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी कावेरी विद्यापीठास भेट देऊन विद्यापीठातील विविध शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. कावेरी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रवीण राव यांनी त्यांचे स्वागत करून विद्यापीठातील विविध उपक्रम व सुविधांची माहिती दिली.

कावेरी विद्यापीठाच्या कृषी यंत्रसामग्री कौशल्य प्रशिक्षण केंद्र, डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स, सिंचन व जलव्यवस्थापन सुविधा, कृषी अभियांत्रिकी प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, स्पीड ब्रीडिंग व आधुनिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या विविध अत्याधुनिक सुविधांची कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित तज्ज्ञांकडून विविध तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, कावेरी विद्यापीठात अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि संशोधनासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा निश्चितच उल्लेखनीय आहेत. कृषी शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही विद्यापीठांनी परस्पर सहकार्य वाढविण्याची मोठी संधी आहे. यासाठी लवकरच दोन्ही विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.

कावेरी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रवीण राव हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माजी विद्यार्थी असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी अभियांत्रिकी, डिजिटल शेती, जलव्यवस्थापन, कृषी यंत्रिकीकरण, आधुनिक पीक सुधारणा तंत्रज्ञान, संशोधन तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांच्या आदान-प्रदानाच्या माध्यमातून सहकार्याच्या विविध शक्यतांवर यावेळी चर्चा झाली.

कावेरी विद्यापीठातील डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स केंद्रात आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित नियंत्रण तंत्रज्ञान, फिल्टरेशन व जलव्यवस्थापनाशी संबंधित उपकरणांची माहिती माननीय कुलगुरूंनी घेतली. तसेच कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण केंद्रातील विविध मॉडेल्स व प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे, यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी स्पीड ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी व आधुनिक कृषी संशोधनासाठीच्या प्रयोगशाळांची पाहणी करताना संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठांनी परस्पर सहकार्य करण्याची गरज माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.

या भेटीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कावेरी विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक, संशोधन व तंत्रज्ञानविषयक सहकार्याला नवी दिशा मिळणार असून, प्रस्तावित सामंजस्य करारामुळे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना विविध संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.