Pages

▼

Wednesday, October 14, 2026

AGRI-REACH उपक्रमांतर्गत ICAR प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 कृषि महाविद्यालय, परभणी येथे पदव्युत्तर व पीएच.डी. प्रवेश परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे AGRI-REACH समितीच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) च्या पदव्युत्तर (PG) व पीएच.डी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. कृषि क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी योग्य दिशा देणे आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. कार्यक्रमासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सुधीर भिनचार यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक तथा कृषि महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ.प्रवीण वैद्य, विभागप्रमुख व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. किरण जाधव, डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. प्रफुल्ल घंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गही उपस्थित होता.

यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी AGRI-REACH या व्यासपीठाचा आपल्या शैक्षणिक ध्येयपूर्तीसाठी प्रभावीपणे उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. AGRI-REACH हा उपक्रम विद्यार्थ्यांना ICAR च्या पदव्युत्तर व पीएच.डी. प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, स्पर्धात्मक परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कृषि क्षेत्रातील उच्च शिक्षण व संशोधनासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक दिशा मिळून त्यांच्या करिअरच्या संधी विस्तारण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. सुधीर भिनचार यांचे कौतुक केले. तसेच या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ.प्रवीण वैद्य यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि स्मार्ट पद्धतीने करावी, असे सांगितले. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे, महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देणे, नियमित सराव करणे आणि उपलब्ध डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

AGRI-REACH समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम घोळवे यांनी प्रास्ताविकात समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आगामी ICAR PG व Ph.D. प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेले नियोजन, प्रस्तावित उपक्रमांची रूपरेषा आणि पुढील कार्यवाही यांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी कृषि शिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सुधीर भिनचार यांनी विद्यार्थ्यांना ICAR च्या पदव्युत्तर व पीएच.डी. प्रवेश परीक्षांच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रवेश परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रमानुसार अभ्यासाचे नियोजन, विषयांची निवड, नियमित सराव, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

कृषि क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना स्पष्ट करून नियोजनबद्ध अभ्यास करावा, नियमित उजळणी करावी आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन करावे, असे त्यांनी सांगितले. पदव्युत्तर व पीएच.डी. प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा, अभ्यासाचे नियोजन, उच्च शिक्षणातील संधी आणि संशोधन क्षेत्रातील करिअर यांसंदर्भात विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रोत्साहित केले. यावेळी डॉ. नेहरकर, डॉ. जाधव आणि वसतिगृह अधीक्षक डॉ. एस. एल. बडगुजर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी AGRI-REACH समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम घोळवे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद सोनकांबळे, सचिव डॉ. आशा चव्हाण तसेच समितीचे सदस्य डॉ. डी. के. झटे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. संतोष फुलारी, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. सुवर्णा चौधरी, डॉ. सईद शबनम, डॉ. कल्याणी देशमुख आणि डॉ. अपूर्वा गुड्डारेड्डी यांच्यासह वनस्पती रोगशास्त्र विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला.

कृषि महाविद्यालय, परभणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.