Pages

▼

Tuesday, October 6, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली वनामकृवित ‘कृषि व संलग्न क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ विषयावर मार्गदर्शन

 कृषि क्षेत्रात नाविन्यता, गुणवत्ता आणि ब्रँडनिर्मितीवर भर द्या : उद्योजिका आशाताई भिसे यांचे प्रतिपादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘कृषि आणि संलग्न क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ या विषयावर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस श्रीमती आशाताई भिसे यांचे दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी  मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. या मार्गदर्शनाचा ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, अधिष्ठाता तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुनाथ जायभाये, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, पुरुषोत्तम नेहरकर आणि डॉ. सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस यांच्या प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी अशा मार्गदर्शनाचा मोठा लाभ होतो. युवा उद्योजक श्रीमती आशाताई भिसे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आशादायी व दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी श्रीमती आशाताई भिसे यांचा परिचय करून देताना त्या अभ्यासू लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट वक्त्या तसेच यशस्वी उद्योजक म्हणून परिचित असल्याचे सांगितले. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाला ‘अ’ दर्जाची मान्यता असून महाराष्ट्रात प्रथम आणि देशात ३४व्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित अशा विद्यापीठात देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून शेतकरी कल्याणाला केंद्रस्थानी ठेवत उद्योजक म्हणून समाजात योगदान द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून शेतकरीकेंद्रित कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘नाव कमवा, पैसा आपोआप येतो’ – आशाताई भिसे

मार्गदर्शन करताना श्रीमती आशाताई भिसे म्हणाल्या की, दीक्षारंभ ते दीक्षांत हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रवास आहे. आज आपण या प्रवासाचा आरंभ करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे विद्यापीठ मला माझे स्वतःचे विद्यापीठ वाटते. याच विद्यापीठाने मला आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित केले असून, अनेक महिलांना पुरस्कार देण्यासाठीही मला या विद्यापीठात येण्याची संधी मिळाली.

भारत हा कृषिप्रधान देश असून विद्यार्थ्यांनी कृषि शिक्षणाची निवड केली आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वप्ने असतात; मात्र आता कृषि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळे आणि भरीव करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा विद्यार्थ्यांनी मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी व्यक्तींचा इतिहास वाचावा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि स्वतःच्या ध्येयासाठी निर्धाराने काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

आपल्या प्रवासाविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, मी इलेक्ट्रॉनिक्स विषयाची पदवीधर असून बँकेत नोकरी केली. मात्र नोकरीचा राजीनामा देऊन शेती व शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याची आणि शेतकरी समूहाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, याचा मला आनंद आहे.

मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असला तरी त्यावर मात करण्याची ताकद येथील शेतकऱ्यांमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. उद्योग व शेतीच्या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. विशेषतः महिलांना सामाजिक बंधने व मर्यादांना सामोरे जावे लागते; मात्र निर्धार, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर या अडचणींवर मात करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

गांडूळ खत निर्मितीच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना त्यांनी कमी खर्चातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व सांगितले. गांडूळ खत निर्मितीसाठी बांबूचा वापर करून उत्पादन खर्च कमी केला. या उपक्रमाची विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनी भेट देऊन पाहणी केली होती, असे त्यांनी नमूद केले. कोणताही उद्योग उभारताना उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय केवळ हौस किंवा मौज म्हणून करू नका. कामाची लाज बाळगू नका. कोणताही उद्योग करा; मात्र त्यातून नाव कमवा. उत्पादनाचा दर्जा कायम राखून स्वतःचा ब्रँड निर्माण करा, असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उद्योगात सातत्य, नाविन्यता आणि उपक्रमशीलता जोपासणे आवश्यक असून, त्यांनी दुग्ध व्यवसायातील आपल्या अनुभवातून हे स्पष्ट केले.

कृषि व संलग्न व्यवसायांच्या संधींबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग उभारण्यावर भर दिला. जे विकते तेच बनवा आणि जे बनवता ते विकण्यासाठी योग्य बाजारपेठ निर्माण करा, असे सांगत विक्री व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला. आकर्षक पॅकेजिंगसह दर्जेदार उत्पादन बाजारपेठेत आणावे, संवादकौशल्य आणि ग्राहकांना पटवून देण्याची क्षमता विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग उभारताना आर्थिक शिस्त व संतुलन महत्त्वाचे असून अनावश्यक कर्जाच्या बोजाखाली अडकू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी सध्या उभारलेल्या दहा एकर ड्रॅगन फ्रूट शेतीची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी कृषि व संलग्न क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करून यशस्वी उद्योजक बनावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी श्रीमती आशाताई भिसे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. त्या उच्चशिक्षित असून इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी बँकेत नोकरीही केली; मात्र नोकरीचा राजीनामा देऊन गांडूळ खत निर्मितीपासून कृषि उद्योगाची सुरुवात केली आणि आज विविध कृषि व संलग्न उद्योग यशस्वीपणे उभारले आहेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीचे प्रत्यक्ष ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आभार शिक्षण प्रभारी डॉ. शंकर पुरी यांनी मानले केले, तर सूत्रसंचालन श्री. कैलास जोंधळे यांनी केले. मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.