Pages

▼

Thursday, October 8, 2026

वनामकृविद्वारा रेणाखळी येथे जागतिक कापूस दिनानिमित्त शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम

 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कापूस संशोधन योजना, परभणी यांच्या वतीने कापूस उत्पादकता मिशन (कापूस कांती), गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक कापूस दिनानिमित्त ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रेणाखळी (ता. पाथरी, जि. परभणी) येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास रेणाखळी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मुक्तीराम हरकळ, कापूस संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी तथा कापूस विद्यावेत्ता डॉ. मेघा प्रदीप जगताप, भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्री. संजय एम. खोडके व श्री. उद्धव कोल्हे, तालुका कृषी अधिकारी श्री. गोविंद कोल्हे, एमसीपी-पीबीडब्ल्यू प्रकल्पाचे समन्वयक व कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, उप कृषी अधिकारी श्री. गोपाल ढगे, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. विशाल दलाल, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती सारिका नारळे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. आशिष अंभोरे, श्री. गजानन रोही, तुळजाई शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम हरकळ तसेच महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. अनिता हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शेतकऱ्यांसोबत कापूस प्रक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कापूस लागवड, घन पद्धतीची कापूस लागवड, पिकाची वाढ, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, कापूस वेचणी व गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कापसाची वेचणी लवकरात लवकर पूर्ण करून फरदड कापूस घेणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. यामुळे गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कापूस संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा प्रदीप जगताप यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कापूस दिनानिमित्त गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे आणि शासकीय संस्थांच्या समन्वयातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. ‘कापूस कांती’ उपक्रमातून उत्पादन खर्चात बचत, उत्पादकता व कापसाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. घन किंवा अतिघन पद्धतीने कापूस लागवड करताना योग्य पीक व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

गावातील महिला शेतकरी गटाने केलेल्या कापूस लागवडीचे कौतुक करून विद्यापीठ, कृषी विभाग आणि भारतीय कापूस महामंडळाच्या सहकार्याने भविष्यातही महिला शेतकरी गटांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येईल, असे डॉ. जगताप यांनी सांगितले.

भारतीय कापूस महामंडळाचे वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्री. संजय एम. खोडके यांनी कापूस विक्री करताना गुणवत्ता जपण्याचे आवाहन केले. चांगल्या प्रतीचा कापूस, कचरा, कवडी किंवा कमी प्रतीचा कापूस वेगवेगळा वेचून स्वतंत्रपणे साठवावा. गुणवत्तेनुसार कापूस वर्गीकृत करून विक्री केल्यास चांगल्या प्रतीच्या कापसाला अधिक दर मिळण्याची शक्यता असते, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळवून देण्यासाठी ‘कस्तुरी कापूस’ हा ब्रँड विकसित करण्यात येत असून, बाजारपेठेतील गुणवत्ता व मागणीबाबत शेतकऱ्यांनी जागरूक राहावे, असे त्यांनी सांगितले.

श्री. उद्धव कोल्हे यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या संकेतस्थळावर किंवा ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. कापूस एकाच वेळी संपूर्ण विक्री न करता आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास बाजारातील परिस्थितीनुसार योग्य दर मिळविण्याची संधी मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

तालुका कृषी अधिकारी श्री. गोविंद कोल्हे यांनी कापूस क्रांती प्रकल्पांतर्गत रेणाखळी येथे राबविण्यात आलेल्या एचडीपीएस (घन पद्धतीच्या कापूस लागवड) प्रकल्पाची माहिती दिली. कापूस उत्पादनातील विविध कामांसाठी आवश्यक अवजारे, त्यामध्ये कॉटन श्रेडरसारखी अवजारे अनुदानावर उपलब्ध असल्याचे सांगून शेतकरी गटांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कापूस लागवडीपासून वेचणी व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा आणि सीसीआय यांच्या समन्वयातून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. दिगंबर पटाईत यांनी प्रास्ताविकातून कापूस पिकाचे शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनातील तसेच महाराष्ट्र, विशेषतः मराठवाड्याच्या कृषी अर्थव्यवस्थेतील महत्त्व विशद केले. ७ ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जात असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. कापूस संशोधन योजना, परभणी आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या माध्यमातून राबविण्यासाठी एमसीपी-पीबीडब्ल्यू प्रकल्प नुकताच मंजूर झाला असून, त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात येत आहे. प्रत्येक गावातून १२ शेतकरी याप्रमाणे एकूण ६० शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करून कापूस उत्पादन व गुणवत्ता टिकवून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल दलाल यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमातून कापूस उत्पादन, घन पद्धतीची लागवड, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, फरदड कापूस टाळणे, कापसाची गुणवत्ता, वेचणीपश्चात हाताळणी आणि सीसीआयमार्फत कापूस विक्री याबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा आणि भारतीय कापूस महामंडळ यांच्या समन्वयातून आयोजित या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतच्या विविध टप्प्यांबाबत तांत्रिक व व्यावहारिक माहिती मिळाली.