Pages

▼

Tuesday, October 13, 2026

वनामकृवि आणि वामन फूड्स, वसमत यांच्यात सामंजस्य करार; करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनातून मराठवाड्यात नव्या उद्योगपर्वाची मुहूर्तमेढ

करवंद उत्पादक शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांसाठी प्रक्रिया उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध होणार – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि वामन फूड्स, वसमत, जि. हिंगोली यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. या करारामुळे करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनावर आधारित उद्योगांच्या विकासाला चालना मिळणार असून, मराठवाड्यातील करवंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

मराठवाड्यातील प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी करवंद लागवडीला प्राधान्य दिले आहे. करवंदाचा वापर प्रामुख्याने प्रसिद्ध करवंद चेरी तयार करण्यासाठी केला जातो. मात्र, या फळापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करून प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी करवंदापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये करवंद पेय, जाम, जेली, चेरी, करवंद गर, करवंद गराची भुकटी, करवंद मुखवास, चाट मसाला, करवंद गरापासून आईस कँडी, करवंद लोणचे, करवंद चटणी आणि करवंद वाईन यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.

विद्यापीठाने विकसित केलेले करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनाचे तंत्रज्ञान शेतकरी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून नवीन प्रक्रिया उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा या सामंजस्य कराराचा प्रमुख उद्देश आहे.

यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे करवंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान उद्योजकांपर्यंत पोहोचल्यास करवंदासारख्या स्थानिक फळपिकाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते. तसेच शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नवउद्योजकांना प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या क्षेत्रात स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू यांनी केले. शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होऊ शकते. करवंद प्रक्रिया उद्योगासाठी करण्यात आलेला हा सामंजस्य करार भविष्यात विविध प्रकारच्या शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वसमत येथील वामन अन्नप्रक्रिया उद्योगाचे शेतकरी तथा उद्योजक श्री. सदाशिव अडकीने यांच्या उद्योगासोबत करण्यात आलेल्या या करारानुसार करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण, नवीन उत्पादनांचा विकास (प्रॉडक्ट डेव्हलपमेंट), पुढील संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी दोन्ही संस्थांकडून सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या उत्पादनांचे विपणन व बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

वामन फूड्स, वसमत येथील अन्नप्रक्रिया उद्योगात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी करण्याची तरतूदही या करारात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना प्रत्यक्ष प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, विभागप्रमुख डॉ. कैलास गाडे, डॉ. जी. एम. माचेवाड, डॉ. एस. के. सदावर्ते, करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ. जोशी, शिक्षण सहयोगी डॉ. देशमुख तसेच विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ व तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योगविकास, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.