Pages

▼

Thursday, October 15, 2026

वनामकृवित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहिली आदरांजली


भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील माननीय कुलगुरू यांच्या बैठक सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे आणि नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आणि देशाच्या वैज्ञानिक, शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाचा परिचय करून दिला.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या वैज्ञानिक संशोधनातून देशाच्या संरक्षण व अवकाश तंत्रज्ञानाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. तसेच, राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची, ज्ञानाची कास धरण्याची आणि राष्ट्राच्या विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार आजही विद्यार्थी, संशोधक आणि तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.

या अभिवादन कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी भारतरत्न डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.